ग्राहकांना लुभावणाऱ्या बिल्डरांच्या क्लृप्त्या परिणामशून्यच..
मुळातच किमती अवाच्या सवा असल्याने त्यावर विकासक देत असलेल्या सवलती ग्राहकांना भुरळ पाडताना दिसत नाहीत, असा निष्कर्ष जे एम फायनान्शियल या दलाली पेढीच्या पाहणी अहवालाने पुढे आणला आहे.
फर्निचरने सुसज्ज घर, मुद्रांक शुल्क, देखभाल खर्चातून सूट अथवा आयफोन, चारचाकी वाहन ते आंतरराष्ट्रीय सहलीचे पॅकेज वगैरे खरेदीदारांना देऊ करण्यात आलेल्या नजराण्यांतून घराच्या किमतीत १ ते जास्तीत जास्त ५ टक्क्य़ांनी फरक पडेल. ग्राहकांचे खरेदीसाठी मन बनेल, इतक्या या बक्षीस सवलती प्रभाव साधत नसल्याचे अहवालाने म्हटले आहे. अहवालाच्या मते प्रत्यक्षात किमती घटताना दिसायला हव्यात. मात्र मुंबई महानगर क्षेत्रात गेल्या वर्षभरात नवीन गृहप्रकल्पांमध्ये किमती वाढल्या नसल्या तरी ही घट जेमतेम १ टक्का इतकीच असल्याचे अहवाल सांगतो.
कर्ज न घेताच घरखरेदी?
पगारदारांना घरासाठी कर्ज मिळविणे फारसे अवघड नसले तरी महामुंबईतील घरांच्या किमती पाहता कर्जाची मात्रा आणि त्याचा दरमहा पडणारा हप्ता मात्र अनेकांसाठी न परवडणारा ठरेल. अशा समयी मागणीतील नरमाईचा सामना करीत असलेल्या स्थावर मालमत्ता उद्योगात अनेक विकासकांनी अपेक्षित ग्राहक मिळविण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या योजलेल्या दिसतात.
दिल्ली-राजधानी परिसर क्षेत्रातून मुंबईत आलेल्या ८०:२० आणि ७०:३० योजनांवर रिझव्‍‌र्ह बँकेकडून र्निबधाची कुऱ्हाड चालविली गेली; परंतु त्याच्याशी मिळतीजुळती, पण घराचा ताबा मिळेपर्यंत त्यासाठी घेतलेला कर्जाचा बोजा ग्राहकांवर येणार नाही आणि अर्थात त्याला हप्तेही भरावे लागणार नाहीत, अशी नोंदणीसमयी रक्कम भरून केवळ १० टक्केरक्कम भरण्याची योजना आजही सुरू आहे. बँकेचे कर्जसाहाय्य मिळाल्यानंतर ४५ दिवसांत घराच्या मूल्याच्या ८० टक्के रक्कम भरावयाची आणि उर्वरित १० टक्के रक्कम घराचा ताबा मिळाल्यावर चुकती करावयाची. मात्र घराचा ताबा मिळेपर्यंत सर्व हप्ते विकासकांकडून भरले जातील, तर मुंबईत गोरेगाव (पूर्व) येथे पाम रेसिडेन्स येथील फ्लॅटची खरेदी प्रत्यक्ष गृहकर्ज न घेता ग्राहकांना शक्य होईल अशी योजना आली आहे. येथील तयार एक, दोन व तीन बीएचके सदनिकांसाठी ३० टक्के बयाणा अदा केल्यावर सत्वर ताबा आणि उर्वरित रक्कम पुढील तीन वर्षांत समान हप्त्यात फेडण्याची मुभा ग्राहकांना दिली गेली आहे.
परवडणाऱ्या किमतीतील वांगणी, बदलापूर येथील एक्सर्बियाच्या गृहप्रकल्पासाठी केवळ २५ हजार रुपयांची बयाणा रक्कम देऊन घराची नोंदणी करता येईल. ७ लाखांपासून पुढे अशी येथील वन रूम किचन आणि एक बीएचके घरांची किमत सुरू होते.