गोरेगाव येथील ‘म्युनिसिपालिका २०१८’ प्रदर्शनात नगररचनाकारांचा मेळा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देशभरात सर्वत्र नागरीकरण वेगाने सुरू असून, केंद्र सरकारने हाती घेतलेल्या १०० स्मार्ट सिटी, ५०० अमृत सिटी, प्रधानमंत्री आवास योजना, २०२२ पर्यंत सर्वासाठी घरे या शहरांच्या कायापालट घडविणाऱ्या योजनांतून केवळ स्थावर मालमत्ता आणि बांधकाम क्षेत्रातील कंपन्यांनाच नव्हे तर उपकरण निर्मात्या, बांधकाम सामग्रीचे निर्माते, तंत्रज्ञान विकासक सेवा कंपन्या आणि अगदी वाहन निर्मात्यांना मोठय़ा व्यवसाय संधी दिसून येत आहेत.

गोरेगाव येथील मुंबई प्रदर्शन संकुलात ‘म्युनिसिपालिका २०१८’ या बुधवारी उद्घाटन झालेल्या प्रदर्शनात भविष्यातील शहरे घडविण्यासाठी कार्यरत संस्था, कंपन्या, सेवा पुरवठादारांनी हा विश्वास व्यक्त केला.

भविष्यातील शहरे ही सुरक्षित आणि नागरिक आणि पर्यावरणाप्रति संवेदनक्षम, तंत्रज्ञानाने जोडलेली, खऱ्या अर्थाने डिजिटल आणि पूर्णपणे स्वयंनिर्भर एकात्मिक शहरे असतील, असे स्वप्न साकारण्यासाठी आधुनिक सामग्री आणि तंत्रज्ञानाच्या पुरवठादार देशी-विदेशी कंपन्यांचे जवळपास २०० दालने म्युनिसिपालिका प्रदर्शन मांडण्यात आली आहेत.

नगर विकासाच्या सरकारच्या योजनाच जवळपास ८ लाख कोटी रुपये खर्चाच्या आहेत, त्यात स्वच्छ भारत अभियान आणि नमामि गंगेसारख्या योजनांची भर घातल्यास आणखी खूप मोठे व्यावसायिक लाभ दिसून येतात, असे या प्रदर्शनाच्या आयोजकांपैकी एक आणि हडकोचे माजी अध्यक्ष व्ही. सुरेश यांनी सांगितले. शिवाय हे प्रदर्शन म्हणजे धोरणकर्ते, स्थानिक स्वराज्य संस्था, महापौर, पालिका आयुक्त, उद्योजक, व्यावसायिक, तंत्रज्ञान आणि अन्य सेवा पुरवठादार यांच्यात विचारविनिमयाचे उत्तम व्यासपीठ ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

हे प्रदर्शन रविवार, २१ सप्टेंबपर्यंत सर्वासाठी खुले आहे. टाटा मोटर्सकडून एकात्मिक कचरा व्यवस्थापन उपाय घन आणि द्रव कचरा गोळा करण्यासाठी सक्शन कम जेटिंग मशीन असलेले टाटा मोटर्सचे वाहन. आधुनिक शहरांमध्ये घनकचरा व्यवस्थापन हा महत्त्वाचा घटक असून, म्युनिसिपालिका प्रदर्शनात टाटा मोटर्स या वाहन निर्मात्या कंपनीने त्या संबंधी योजलेल्या उपाययोजनांचे प्रात्यक्षिक मांडले आहे. शहरांमधून दैनंदिन निर्माण होणारा वाढता कचरा, त्याचे संग्रहण आणि वाहतूक ही एक मोठी समस्या बनत असून, त्यावर खासगी आणि सरकारी क्षेत्राने एकत्र येऊन काम केले पाहिजे, अशी टाटा मोटर्सची भूमिका असल्याचे कंपनीचे विक्री विभागाचे उपाध्यक्ष आर. टी. वासन यांनी सांगितले. कंपनीने घन आणि द्रव कचरा गोळा करून त्याच्या वाहतुकीसाठी एकात्मिक उपाययोजना म्हणून विकसित केलेली वाहने प्रदर्शनात मांडली आहेत.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Development in mumbai
First published on: 21-09-2018 at 02:19 IST