तीन वर्षांत प्रकल्प पूर्ण करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गाचे काम येत्या मार्चमध्ये सुरू करणार असून तीन वर्षांत हा प्रकल्प पूर्ण होईल. २४ जिल्ह्यांना जोडणारा हा महामार्ग राज्यासाठी अत्यंत महत्वाचा असून त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांची समृद्धी होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोस परिषदेत व्यक्त केला.

जागितक आर्थिक परिषदेतील वातावरण भारतकेंद्रित झाले असतानाच महाराष्ट्रही त्यात अग्रेसर राहिला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या परिषदेत राज्यातील परिवर्तन प्रक्रियेची विविध माध्यमांतून माहिती करून दिली.

भारतीय उद्योग महासंघ (सीआयआय) यांच्यावतीने दावोसमध्ये ‘इंडस्ट्रीयल कॉरिडॉर्स इन इंडिया डिमांड लेड प्लॅनिंग अ‍ॅण्ड फायनान्सिंग’ या विषयावर बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये नीति आयोगाचे मुख्याधिकारी अमिताभ कांत यांच्यासह मुख्यमंत्री  फडणवीस व इतर मान्यवरांनी सहभाग घेतला. नागपूर मुंबई महाराष्ट्र समृद्धी कॉरिडॉरचा आराखडा यावेळी सादर करण्यात आला. चोवीस जिल्ह्यंना जोडणारा हा कॉरिडॉर संपूर्ण राज्यासाठी विशेषत: शेतकरम्य़ांच्या समृद्धीसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. कृषी केंद्रांच्या विकासातून कृषी उत्पादनांची वाहतूक, पुरवठा आणि कृषी उत्पादनांवर प्रक्रिया करण्यासाठी शीतगृहांमध्ये त्यांची साठवणूक करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी या सादरीकरणात दिली. भारतातील सर्वात मोठा आणि सुनियोजित असा हा कॉरिडॉर तीन वर्षांत पूर्ण करण्यात येईल. मार्चमध्ये या प्रकल्पाचे काम सुरु करण्यात येणार असून त्यासाठी आवश्यक जमिनीपैकी ८५ टक्के जमीन थेट खरेदीतून पुढील महिन्यापर्यंत सरकारला मिळेल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. या प्रकल्पाचे कौतुक करताना  कांत म्हणाले, महाराष्ट्राने जमीन संपादन करताना सहमतीने केलेल्या वाटाघाटी, त्यामध्ये भूधारकांचे पूर्णपणे झालेले समाधान, चांगला मोबदला, प्रकल्पामध्ये प्राप्त केलेला सर्वोत्कृष्ट सहभाग आणि या सर्व प्रक्रियेमुळे टळलेले कायदेशीर पेचप्रसंग या बाबी उल्लेखनीय आहेत.

मुंबईतील वाहतुकीची गतिमानता वाढविण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या प्रकल्पांबाबतही मुख्यमंत्र्यांनी यावेळी माहिती दिली. २०२२ पर्यंत सर्व प्रकारची वाहतूक एकात्मिक पद्धतीने चालविली जाणारे मुंबई हे पहिले शहर असेल. एकूण २५८ किलोमीटर लांबीची मेट्रो, उन्नत मार्ग (एलिव्हेटेड कॉरीडॉर), सागरी किनारा रस्ता, सी लिंक, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, नवीन विमानतळ आणि जलवाहतुकीसाठीचे प्रकल्प ही सारी कामे प्रगतीपथावर असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

दावोस येथे मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशीही संवाद साधला. ते म्हणाले, यापूर्वी चीनभोवती केंद्रित असणारे येथील वातावरण आता भारतकेद्रित झाले आहे. भारताने तीन वर्षांत केलेल्या विकासामुळे झालेला हा मोठा बदल आहे. महाराष्ट्रातही गुंतवणुकीसाठी मोठय़ा प्रमाणावर उद्योजक उत्सुक असून आम्ही देशाला विकासाचे महाराष्ट्र मॉडेल देत आहोत. पायाभूत सुविधांवर आधारित विकास करण्याचा आमचा निर्धार आहे.

देशातील गुंतवणुकीपैकी निम्म्याहून अधिक गुंतवणूक महाराष्ट्रात झाली असून केंद्र आणि राज्य सरकारमध्ये असलेल्या उत्तम समन्वयामुळेच हे शक्य झाले आहे. तसेच या समन्वयामुळेच नवी मुंबई विमानतळ, ट्रान्स-हार्बर लिंक असे महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लागले आहेत, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

मायक्रोसॉफ्ट मेळघाटात साकारणार डिजिटल व्हिलेज

मायक्रोसॉफ्टचे मुख्याधिकारी  सत्या नाडेला यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या सहकार्याने महाराष्ट्रात मेळघाटातील हरिसाल हे गाव देशातील पहिले ‘डिजिटल व्हिलेज’ बनविण्यासह आणखी डिजिटल गावे विकसित करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट करीत असलेल्या सहकार्याबद्दल नाडेला यांचे मुख्यमंत्र्यांनी आभार मानले.