16 November 2019

News Flash

आर्थिक सल्लागार की आर्थिक उत्पादनांचा वितरक, कोणाकडे जावं?

तुम्ही तुमचा आर्थिक सल्लागार कसा निवडता यावर तुमच्या कुटुंबाचे आर्थिक भवितव्य ठरते

प्रतीकात्मक छायाचित्र

– व्ही. विश्वानंद

निवडणुका म्हणजे तुमच्या-माझ्यासारख्या मतदारांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते. या निवडणुकांच्या माध्यमातून आपण आज जी निवड करणार असतो, त्यावर आगामी काही काळातील प्रगती तर अवलंबून असतेच, पण एकंदरीतच आपल्या देशाच्या नशिबात काय वाढून ठेवले आहे आणि कुठल्या दिशेने आपला देश जाणार आहे, हे देखील या निवडणुकांवरच ठरत असते. त्यामुळे निवड करण्याचा जो आपला अधिकार आहे, तो केवळ अधिकार न राहाता ती एक महत्त्वाची जबाबदारी बनते आणि त्या जबाबदारीची परिणामकारकता, आपण किती हुशारीने या निवडीच्या अधिकाराचा वापर करतो, त्यावर ठरत असते.

आपला आर्थिक सल्लागार निवडण्याची प्रक्रिया देखील आपल्या मतदारसंघाचा किंवा देशाचा प्रतिनिधी निवडण्यापेक्षा फार वेगळी नाही. फरक इतकाच आहे की, निवडणुकीत आपण देशाचा विचार करतो, तर आर्थिक सल्लागार निवडताना वैयक्तिक उद्दिष्टांना महत्त्व असते. किती मेहनतीने संशोधन करून अचूकपणे तुम्ही तुमचा आर्थिक सल्लागार निवडता, यावर तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे आर्थिक भवितव्य ठरत असते.
आपल्या देशात बहुतांश लोकांच्या बाबतीत सर्वसाधारणपणे आर्थिक उत्पादनांचे वितरकच आर्थिक सल्लागाराची भूमिका बजावताना दिसतात. त्यामुळे खरोखरच वेगळ्या आर्थिक सल्लागाराची गरज आहे का, याबाबतीत गोंधळ निर्माण होणे स्वाभाविक आहे. मात्र, आर्थिक उत्पादनांचे वितरक आणि आर्थिक सल्लागार म्हणजे एकच असे वरवर वाटले तरी दोघांच्या कामाच्या स्वरूपात खूप फरक आहे.

दोघांमध्ये फरक काय?

आर्थिक उत्पादनांचे वितरक हे गुंतवणुकीबाबत सल्ला देत नाहीत, तर ते केवळ तुमच्यासमोर विविध आर्थिक उत्पादने ठेवतात. तुम्हालाच तुमची गरज ओळखून त्यानुसार निवड करावी लागते. त्याबदल्यात त्यांना संबंधित कंपन्यांकडून कमिशन मिळते. यामुळे बहुतांश वेळा त्यांच्याकडून ग्राहकाची खरी गरज काय आहे, हे पाहण्यापेक्षा आपल्याजवळ असलेल्या आर्थिक उत्पादनांची विक्री करण्याकडे लक्ष केंद्रीत केले जाते.

दुसरीकडे आर्थिक सल्लागार मात्र ग्राहकाची नेमकी गरज काय आहे, हे जाणून घ्यायचा प्रयत्न करतात. आपल्या ग्राहकाची आयुष्यातील उद्दिष्टे काय आहेत, हे जाणून घेऊन, त्याच्या गरजांचा सखोल अभ्यास आणि विश्लेषण करून त्यानुसार आर्थिकदृष्ट्या सुरक्षित पद्धतीने कुठे व किती गुंतवणूक करायची याचा सल्ला ते देतात. एखाद वेळेस जर आर्थिक सल्लागाराकडे ग्राहकाच्या गरजेनुसार आवश्यक असे आर्थिक उत्पादन नसेल तर ते सरळ तो व्यवहार थांबवणे पसंत करतात. पण अनावश्यक उत्पादनाची विक्री करत नाहीत.

आवश्यक माहिती गोळा करण्यात त्यांना किती स्वारस्य आहे त्याचा विचार करा

सुयोग्य आर्थिक नियोजनासाठी संबंधित व्यक्तीच्या आर्थिक बाबीविषयी सर्वसमावेशक माहिती गोळा करणे गरजेचे असते आणि ही गरज ओळखणे तितकेच महत्त्वाचे असते. त्यामुळे तुम्ही तुमच्या आर्थिक नियोजनाची सूत्रे ज्याच्या हाती सोपवणार आहात, तो तुमच्या आकांक्षा, उत्पन्न, खर्च, अल्पकालीन आणि दीर्घकालीन उद्दिष्टे, तुमच्या मालमत्ता, देणी, करदायित्व आदींविषयी प्रश्न विचारत आहे की नाही, ही सर्व माहिती जाणून घेण्यात त्याला स्वारस्य आहे की नाही, हे तपासणे महत्त्वाचे आहे. आर्थिक उत्पादनाधारित सल्ला देण्याऐवजी तुमच्या गरजा जाणून त्यानुसार सल्ला ती व्यक्ती देत आहे की नाही, हे देखील महत्त्वाचे आहे. आर्थिक उत्पादनांचा वितरक हा तुमच्या गरजांपेक्षाही कमिशनच्या लालसेपोटी त्याच्याकडे असलेली उत्पादने विकण्यात अधिक रस दाखवण्याचा धोका असतो, पण आर्थिक सल्लागार मात्र तुमच्या गरजा ओळखून त्यानुसार अधिक तटस्थ सल्ला देण्याची शक्यता अधिक असते.

गुंतवणुकीतले धोके आणि परतावा यासंदर्भात चर्चा करण्याची तयारी असली पाहिजे

आर्थिक सल्लागार निवडतानाचा एक महत्त्वाचा निकष म्हणजे गुंतवणुकीतील संभाव्य धोके आणि त्या गुंतवणुकीतून मिळणारा परतावा यासंदर्भात त्याची तुमच्याशी चर्चा करण्याची तयारी कितपत आहे. एखाद्या उत्पादनाने आपल्या ग्राहकांना भूतकाळात किती भरघोस परतावा दिला, याचे उदात्तीकरण करण्याऐवजी एक चांगला आर्थिक सल्लागार धोका पत्करण्याची तुमची तयारी कितपत आहे हे जाणून घेईल, गुंतवणुकीवरील परताव्याविषयी तुम्हाला योग्य कल्पना देईल आणि त्याचबरोबर संबंधित गुंतवणुकीत अल्पकालीन आणि दीर्घकालीन धोके काय आहेत, याचीही तुम्हाला कल्पना देईल.

विविध आर्थिक उत्पादनांविषयी परिपूर्ण चर्चा करण्याची तयारी असणे महत्त्वाचे

विशिष्ट आर्थिक उत्पादन तुमच्या गरजेनुसार आहे का किंवा तुमच्या गुंतवणुकीची मूल्यवृद्धी करत आहे का, याची काळजी जो घेतो, तो तुमच्यासाठी आर्थिक सल्लागार म्हणून योग्य आहे. तुमच्या ज्या असंख्य गरजा असतात, मग ते निवृत्तीचे नियोजन असेल, संपत्तीची निर्मिती असेल, कर्जाची परतफेड असेल किंवा अन्य काही, या सर्व गरजांची पूर्तता करण्याच्या दृष्टीने जो उपलब्ध असलेल्या सर्व गुंतवणूक पर्यायांचा परिपूर्ण सारांश तुमच्यासमोर ठेवेल, अशा आर्थिक सल्लागाराची निवड करणे महत्त्वाचे आहे. आर्थिक नियोजन कसे करावे, याबाबत परिपूर्ण मार्गदर्शन करण्याची क्षमता आर्थिक सल्लागारात असते. असे करताना एखादे उत्पादन तुमच्या गरजेनुसार नसेल तर त्याची विक्री करण्यापासून माघार घेतानाही तो कचरत नाही.

संस्थात्मक सल्लागार की वैयक्तिक सल्लागार?

आर्थिक सल्लागारांचे दोन ढोबळ प्रकार आहेत – एक म्हणजे वैयक्तिक आर्थिक सल्लागार जो आर्थिक बाबींची फारशी माहिती नसलेल्यांना व्यावसायिक तत्त्वावर वैयक्तिक पातळीवर सल्ला देतो आणि दुसरा प्रकार म्हणजे संस्थात्मक सल्लागार, ज्या आर्थिक गुंतवणुकीच्या पर्यायांबाबत सल्ला देणाऱ्या संस्था असतात. ग्राहकांच्या विशिष्ट गरजा लक्षात घेऊन दोन्ही प्रकारातले सल्लागार काम करतात. उदाहरणार्थ, सर्वसाधारण ग्राहक अशा वैयक्तिक आर्थिक सल्लागाराची निवड करेल, ज्याच्याशी वैयक्तिक पातळीवर व्यवहार करणे त्याला सुलभ वाटते. परंतु, ज्याच्या गुंतवणुकीचा पसारा खूप आहे, अशा एखाद्या उच्च गुंतवणूकमूल्य असलेल्या गुंतवणूकदाराला (हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल) विस्तृत परिप्रेक्ष्य असलेल्या संस्थात्मक सल्लागाराची गरज भासू शकते.

निवडणुकीत तुमचे मत देण्यापूर्वी ज्याप्रमाणे उमेदवारांची सखोल माहिती करून घेतली पाहिजे, त्याचप्रमाणे आर्थिक सल्लागार व आर्थिक उत्पादनांचा वितरक यापैकी कोणाची निवड करायची, याबाबत गोंधळ असेल तर तुम्हाला विविध घटकांचा विचार करावाच लागेल. विशेषतः सध्या या दोघांना अलग करणारी सीमारेषा खूप विरळ झालेली असताना तर ही बाब खूप महत्त्वाची आहे. अगदी साध्या बाबींचा काळजीपूर्वक विचार करून तुम्ही तुमच्या आर्थिक नियोजनाची दिशा उज्ज्वल भवितव्यासाठी बदलू शकता.

(लेखक मॅक्स लाइफ इन्शुरन्समध्ये उपव्यवस्थापकीय संचालक आहेत)

First Published on June 7, 2019 3:24 pm

Web Title: difference between financial adviser and financial distributor