पूर्वी माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित कंपन्यांमध्ये मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (सीटीओ) किंवा मुख्य माहिती (तंत्रज्ञान) अधिकारी असे एक महत्त्वाचे पद असायचे. आता नव्या जमान्यात हे पद कालबाह्य़ झाले असून, यापुढे आयटी क्षेत्रातील कंपन्यांसाठी डिजिटल मुख्याधिकारी हे पद गरजेचे असेल, असे प्रतिपादन डिजिटल क्रांतीच्या क्षेत्रातील जगद्विख्यात संशोधक जॉर्ज वेस्टरमन यांनी केले.

डिजिटल क्रांतीमुळे संपूर्ण जगभरातील आयटी कंपन्यांना एका वेगळ्या क्रांतिकारक बदलांना सामोरे जावे लागते आहे. त्या क्रांतीमुळे जगभरात झालेले बदल आणि त्याचा आयटी कंपन्यांवर झालेला परिणाम या विषयामध्ये जॉर्ज वेस्टरमन हे तज्ज्ञ समजले जातात. नासकॉमच्या यंदाच्या लीडरशिप फोरममध्ये विशेष व्याख्याता म्हणून त्यांना पाचारण करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते म्हणाले की, डिजिटायझेशननंतर आता आयटी कंपन्यांमध्ये मोठे बदल झाले आहेत. त्यातील सर्वात महत्त्वाचा बदल हा डिजिटल मुख्याधिकारी हाच आहे. आयटी कंपन्यांमधील डिजिटल अधिकारी हा किती नावीन्यपूर्ण विचार करणारा आणि दूरदृष्टी असलेला आहे, यावरच भविष्यात आयटी कंपन्यांची प्रगती कशी होणार ते ठरेल. या डिजिटल अधिकाऱ्यांना आयटी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांच्या बदललेल्या भूमिका लक्षात घ्याव्या लागणार आहेत. पूर्वी विक्री विभागातील अधिकारी प्रत्यक्ष बाहेर जाऊन विक्रीच्या संदर्भातील ग्राहक मिळविण्याचे काम करायचा. आता त्याचेही कामच बाद झाले असून डिजिटायझेशनच्या माध्यमातून कंपनीच्या डिजिटल अधिकाऱ्यालाच थेट ग्राहकापर्यंत पोहोचता येणार आहे. भविष्यातील प्रत्येक उत्पादन कस्टमाइज्ड म्हणजेच ग्राहकाच्या वैयक्तिक पसंतीनुसार असेल, हे गृहीत धरावे लागणार आहे. कर्मचाऱ्यांच्या डिजिटल माध्यमांच्या वापरापासून ते ग्राहकांसाठी व कंपनीसाठी वापरावयाच्या सर्व प्रकारच्या डिजिटल माध्यमांचे भान या पदावरील व्यक्तीला असावे लागेल, ती आयटी कंपन्यांची गरज असणार आहे. त्यासाठी तयारीला लागा, असा संदेशही त्यांनी भारतातील आयटी कंपन्यांच्या उपस्थित सीईओंना या परिषदेत दिला.

धवलक्रांतीप्रमाणेच डिजिटल क्रांतीही गरीब जनतेसाठीच!
मुंबई: भारताचे भविष्य बदलणाऱ्या धवलक्रांतीप्रमाणेच केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेली डिजिटल क्रांती ही देशातील गरीब आणि संधींपासून वंचित राहिलेल्या समाजासाठीच आहे. त्यामुळे या नव्या क्रांतीमध्ये सामान्य माणूस मध्यभागी कसा राहील, याचा विचार देशातील आयटी कंपन्यांनी करावा, असे आवाहन माहिती तंत्रज्ञान व दूरसंवादमंत्री रवी शंकर प्रसाद यांनी येथे केले. नासकॉम परिषदेच्या उद्घाटनाच्या सत्रामध्ये ते म्हणाले की, या डिजिटल इंडिया प्रकल्पाला आता केंद्र सरकारने मेक इन इंडियाची जोड दिली आहे. भारतीयांची हुशारी अधिक माहिती तंत्रज्ञान म्हणजेच उद्याचा नवा भविष्यवेधी भारत असे नव्या भारताचे समीकरण असेल, असेही ते म्हणाले.
तत्पूर्वी प्रास्ताविक करताना नासकॉमचे सरचिटणीस आर. चंद्रशेखरन म्हणाले की, येत्या २०२० सालापर्यंत तब्बल ३०० दशकोटी अमेरिकन डॉलर्सच्या महसुलाचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट नासकॉमने ठरविले आहे.