News Flash

डिजिटल अर्थव्यवस्थेपुढे ‘रोकडे’ प्रश्नचिन्ह

चलनातील रोखीचे प्रमाण १७ टक्के वाढून २१.१ लाख कोटींवर

(संग्रहित छायाचित्र)

एकीकडे निश्चलनीकरणानंतर आलेल्या डिजिटल मंचामुळे रोकडरहित व्यवहार वाढूनही, चलनात असलेल्या रोखीचे प्रमाणही अद्याप चढेच आहे. मोठय़ा मूल्याच्या नोटांसह चलनातील रोकडीचे प्रमाण मार्च २०१९ अखेर १७ टक्क्यांनी झेपावत २१.१० लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. यामध्ये ५०० व २,००० रुपयांसारख्या मोठय़ा मूल्याच्या नोटांचा हिस्सा ८२ टक्के इतका आहे.

रिझव्‍‌र्ह बँकेचा २०१८-१९ आर्थिक वर्षांचा अहवाल गुरुवारी जाहीर झाला. यातून नोव्हेंबर २०१६ मध्ये जाहीर निश्चलनीकरणाच्या  डिजिटल अर्थव्यवस्थेच्या घोषित उद्दिष्टाच्या सफलतेपुढे प्रश्नचिन्ह उभे करणारी आकडेवारी पुढे आली आहे. डिजिटल माध्यमांच्या उपयोगासह, चलनातील रोकडीचा वापर वाढल्याचेही स्पष्ट होत आहे. मार्च २०१९ अखेर अर्थव्यवस्थेतील नोटांची संख्या ६.२ टक्क्यांनी वाढून १०.८७ कोटी झाली आहे, तर रोख चलनाचे प्रमाण १७ टक्क्यांनी वाढून २१.१० लाख कोटी रुपये झाले आहे.

डिजिटल माध्यमातून देयक व्यवहारांचे प्रमाण सरलेल्या वर्षांत ५९ टक्क्यांनी वाढले व जून २०१९ अखेर या माध्यमांतून २३.३० अब्ज व्यवहार झाले आहेत. खोटय़ा नोटांची संख्या वर्षभरापूर्वीच्या ५.२२ लाखांवरून ३.१७ लाखांवर आली आहे. अर्थव्यवस्थेत नव्याने आलेल्या ५०० व २,००० रुपयांच्या नोटांमध्ये २१,००० नोटा या खोटय़ा आढळल्या आहेत. तर नोटा छपाईसाठीचा खर्च ४,९१२ कोटी रुपयांवरून ४,८११ कोटी रुपयांपर्यंत आला आहे.

चलनात ५०० रुपयांच्या नोटांचे प्रमाण ४२ टक्के  आहे, तर २,००० रुपयांसह चलनात असलेल्या एकत्रित नोटांचे प्रमाण ८२ टक्के इतके आहे. तरी मागील वर्षांच्या तुलनेत चलनातील २,००० रुपयांच्या नोटांचे मूल्य ६.५८ लाख कोटी रुपये  असे यंदा घटले आहे.

नोव्हेंबर २०१६ मध्ये निश्चलनीकरण लागू करताना केंद्र सरकारने चलनातील जुन्या ५०० व १,००० रुपयांच्या नोटा (८६ टक्के) बाद करण्यात येत असल्याचे जाहीर केले होते. तेव्हा या नोटांचे मिळून १५.४१ लाख कोटी रुपयांच्या नोटा चलनात होत्या. ्त्यापैकी १५.३१ लाख कोटी रुपये मूल्याच्या बाद नोटा बँकांमध्ये जमा झाल्या. फक्त १०,७२० कोटी रुपये मूल्याच्या नोटा वगळता ९९.९ टक्के मूल्याच्या नोटा बँकांकडे परत आल्या होत्या.

बँक घोटाळ्यांमध्ये ७१,५४३ कोटी फस्त

*  गेल्या वित्त वर्षांत विविध बँकांमध्ये झालेल्या आर्थिक घोटाळ्यांची संख्या १५ टक्क्यांनी उंचावली असून गेल्या वित्त वर्षांत ही रक्कम ७१,५४३ कोटी रुपयांवर गेली आहे. रकमेबाबत हे प्रमाण ७३.८ टक्क्यांनी वाढले आहे.

मार्च २०१९ अखेरच्या वर्षांत ६,८०१ बँक घोटाळे प्रकरणे नोंदली गेली आहेत. २०१७-१८ मध्ये ही संख्या ५,९१६ होती व त्यातील रक्कम ४१,१६७.०४ कोटी रुपये होती. बँक घोटाळे नोंदीत सर्वाधिक हिस्सा सार्वजनिक बँकांचा राहिला आहे.

अशा बँकांमधील घोटाळ्यांची प्रकरणे ३,७६६ व त्यातील रक्कम ६४,५०९.४३ कोटी रुपये नोंदली गेली आहे. १०० कोटी   रुपयांवरील रकमेच्या घोटाळ्यांतील रक्कम ५२,२०० कोटी आहे. कार्ड, इंटरनेट तसेच ठेवींबाबत झालेल्या घोटाळ्याचे प्रमाण ०.३ टक्के आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 30, 2019 1:26 am

Web Title: digital economy currency cash flow abn 97
Next Stories
1 लवकरच उपग्रह तंत्रज्ञानाच्या आधारे शेतीसाठी जलव्यवस्थापन
2 इंडियन ऑइलचे दोन लाख कोटींच्या गुंतवणुकीचे नियोजन
3 कमकुवत मागणीवर उतारा ; हिंदुस्थान युनिलिव्हरकडून किमतीत ३० टक्के कपात
Just Now!
X