नव्या धाटणीच्या ११ पेमेंट बँक परवान्यांसाठी रिझव्‍‌र्ह बँकेकडून तत्त्वत: मंजुरी मिळविणाऱ्यांपैकी एक असलेल्या दिलीप संघवी फॅमिली अँड असोसिएट्स (डीएसए) यांनी या प्रयत्नातून माघार घेत असल्याचे शुक्रवारी स्पष्ट केले. अन्य दोन भागीदारांसह सामूहिकपणे घेतला गेलेला हा माघारीचा निर्णय रिझव्‍‌र्ह बँकेलाही कळविण्यात आला आहे.
भारतातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादी मुकेश अंबानी यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर असलेले दिलीप संघवी हे औषधनिर्मिती क्षेत्रातील सन फार्मा लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. गेल्या वर्षी त्यांनी पेमेंट बँकेसाठी रिझव्‍‌र्ह बँकेकडे व्यक्तिगत स्वरूपात अर्ज दाखल केला होता. सप्टेंबर २०१५ मध्ये रिझव्‍‌र्ह बँकेकडून तत्त्वत: मंजुरी मिळविल्यानंतर, त्यांनी टेलिनॉर फायनान्शियल सव्‍‌र्हिसेस आणि आयडीएफसी बँक अशा त्रिपक्षीय भागीदारीतून पेमेंट बँक स्थापनेचे प्रयत्न सुरू केले होते.
दूरसंचार व बँकिंग व वित्त क्षेत्रातील दांडग्या अनुभवाची जोड असलेल्या अनुक्रमे टेलिनॉर आणि आयडीएफसीसारख्या भागीदारांद्वारे प्रस्तावित पेमेंट बँकेचा ढाचा आणि कारभार रचनेबाबत गेल्या आठ महिन्यांत अनेकवार झालेल्या चर्चाविमर्शातून एकमतही बनले होते; परंतु आता सर्व भागीदारांनी संपूर्ण सहमतीनेच या उपक्रमातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असल्याचे दिलीप संघवी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.
या प्रस्तावित उपक्रमामध्ये अन्य भागीदारांसह काम करण्याचा अनुभव अतिशय चांगला राहिल्याचे नमूद करून, भविष्यातही एकत्रित सहयोगाच्या संधीच्या आपण प्रतीक्षेत राहू, अशी प्रतिक्रिया आयडीएफसी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्याधिकारी राजीव लाल यांनी या संदर्भात बोलताना व्यक्त केली.