केंद्र सरकारच्या निवडक २६ योजनांतील अनुदानाचे थेट लाभार्थीच्या बँक खात्यात रोखीने हस्तांतरण करणाऱ्या महत्त्वाकांक्षी योजनेचे नववर्षांत देशातील ५१ जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यात अंमल सुरू झाला असून, यासाठी मोजक्या पाच बँकांकडून लाभार्थीना ‘सरल मनी’ या व्हिसासमर्थ प्रीपेड कार्डाचे वितरण केले जाणार आहे. ‘आधार’चे अध्यक्ष नंदन नीलेकणी यांनी बुधवारी नवी दिल्लीत मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या उपस्थितीत या ‘सरल मनी’ कार्डाचे अनावरण केले. हे एक प्रकारचे डेबिट कार्ड असून त्याचे वितरण करण्यासाठी स्टेट बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, इंडियन ओव्हरसीज बँक आणि अ‍ॅक्सिस बँक या पाच बँका सरकारने निश्चित केल्या आहेत. या बँकांतील सरकारी योजनांच्या लाभार्थीना त्यांच्या आधार कार्डासह हे ‘सरल मनी’ प्रीपेड कार्डही बहाल केले जाणार आहे. ज्या गावांमध्ये बँकांच्या शाखा पोहचलेल्या नाहीत, तेथील लाभार्थीची सोय पाहून हा उपाय पुढे आणला गेला आहे. अशा ठिकाणी हे कार्ड लाभार्थीना व्यय-विनिमयासाठी उपयुक्त ठरेल. डिसेंबर २०१४ पर्यंत ही योजना संपूर्ण देशस्तरावर राबविली जाणार आहे.