23 October 2018

News Flash

प्रत्यक्ष कर संकलनात दुहेरी अंकवृद्धी

२०१६-१७ या आर्थिक वर्षांत सरकारचे प्रत्यक्ष कर संकलन ८.४९ लाख कोटी रुपये झाले होते.

एप्रिल ते डिसेंबरदरम्यान ६.५६ लाख कोटींचा महसूल

व्यक्तिगत प्राप्तिकर, कंपनी कर, संपत्ती कर आदींचा समावेश असलेल्या प्रत्यक्ष कराचे सरकारचे संकलन गेल्या नऊ महिन्यांत दुहेरी अंकाने वाढले आहे. एप्रिल ते डिसेंबर दरम्यान प्रत्यक्ष कर संकलन वार्षिक तुलनेत १८.२० टक्क्यांनी वाढून ६.५६ लाख कोटी रुपयांवर गेले आहे.

चालू वित्त वर्षांतील पहिल्या नऊ महिन्यांत जमा झालेले प्रत्यक्ष कर संकलन हे २०१७-१८ या आर्थिक वर्षांकरिता अर्थसंकल्पात अंदाजित केलेल्या उद्दिष्टापैकी ६७ टक्के आहे. या एकूण वित्त वर्षांत सरकारला एकूण ९.८० लाख कोटी रुपयांचा प्रत्यक्ष कर मिळण्याचा अंदाज आहे.

एप्रिल ते डिसेंबर दरम्यान परताव्यापूर्वीचे ढोबळ प्रत्यक्ष कर संकलन १२.६ टक्क्यांनी वाढून ७.६८ लाख कोटी रुपये झाले आहे. यामधील परताव्याची रक्कम १.१२ लाख कोटी रुपये आहे. ३.१८ लाख कोटी रुपये अग्रिम करापोटी जमा झाले आहेत. त्याची वाढ वर्षभरापूर्वीच्या याच कालावधीपेक्षा १२.७ टक्के अधिक आहे. कंपन्यांमार्फत जमा होणाऱ्या अग्रिम कराची रक्कम १०.९ टक्क्यांनी वाढली आहे, तर व्यक्तिगत प्राप्तिकर २१.६ टक्क्यांनी वाढला आहे.

आधीच्या, २०१६-१७ या आर्थिक वर्षांत सरकारचे प्रत्यक्ष कर संकलन ८.४९ लाख कोटी रुपये झाले होते. तत्कालीन अर्थसंकल्पातील अंदाजित ८.४७ लाख कोटी रुपयांपेक्षा ते अधिक झाले होते.

First Published on January 10, 2018 2:33 am

Web Title: direct tax collection