चालू आर्थिक वर्षांच्या एप्रिल ते जानेवारी अशा पहिल्या दहा महिन्यांत सरकारचे प्रत्यक्ष करसंकलन ११.३८ टक्क्यांनी वाढले असून एप्रिल २०१४ ते जानेवारी २०१५ दरम्यान ही रक्कम ५.७८ लाख कोटी रुपये झाली आहे. वर्षभरापूर्वी याच कालावधीत ती ५.१९ लाख कोटी रुपये इतकी होती. सरकारची १६ टक्के उद्दिष्टवाढ पाहता ही रक्कम कमी आहे.e05२०१४-१५ साठी सरकारने प्रत्यक्ष करसंकलनाचे उद्दिष्ट ७.३६ लाख कोटी रुपयांचे राखले आहे. वार्षिक तुलनेत ही वाढ १६ टक्के अपेक्षित आहे. गेल्या दहा महिन्यांतील वेग पाहता चालू आर्थिक वर्षांच्या उर्वरित कालावधीत उद्दिष्टपूर्तीसाठी दीड लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम जमा करण्याचे आव्हान आहे.
चालू आर्थिक वर्षांत गोळा करावयाच्या १३.६० लाख कोटी रुपयांच्या कर महसुलामध्ये प्रत्यक्ष कराच्या वाढीचे उद्दिष्ट १६, तर अप्रत्यक्ष करसंकलनाचे उद्दिष्ट १६ टक्के आहे. यंदा नियमित करसंकलनातील वाढ वर्षभरापूर्वीच्या २४.१४ टक्क्यांच्या तुलनेत १७.२५ टक्के राहिली आहे. तर कर वजावट स्रोताचे प्रमाणही वर्षभरापूर्वीच्या १६.६५ टक्क्यांवरून यंदा अवघ्या ७.७९ टक्क्यांवर आले आहे.
केंद्रीय अर्थखात्याने शुक्रवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या दहा महिन्यांत कंपनी कर, वैयक्तिक प्राप्तिकर, रोखे व्यवहार कर, अग्रिम कर, स्वयंनिर्धारक कर यांमध्ये भरघोस दुहेरी आकडय़ातील वाढ नोंदली गेली आहे. तर निव्वळ प्रत्यक्ष कर, कर वजावट स्रोत, नियमित करसंकलनातील वाढ काहीशी मंदावली आहे.