नवी दिल्ली : चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या नऊ महिन्यांमध्ये सरकारच्या प्रत्यक्ष कर संकलनाचे प्रमाण दुहेरी अंकापर्यंत वाढले आहे. एप्रिल ते डिसेंबर २०१८ दरम्यान सरकारचा प्रत्यक्ष कर महसूल ८.७४ लाख कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षांच्या याच कालावधीच्या तुलनेत त्यात यंदा १४.१ टक्के वाढ झाली आहे.

केंद्रीय अर्थखात्याने सोमवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या नऊ महिन्यात परताव्याची रक्कम १.३० लाख कोटी रुपये असून ती वार्षिक तुलनेत १७ टक्के अधिक आहे.

यंदा अग्रिम करापोटी ३.६४ लाख कोटी रुपये जमा झाले असून त्यातील वाढ १४.५ टक्के नोंदली गेली आहे. तर निव्वळ करसंकलन १३.६ टक्क्य़ांनी वाढून ७.४३ लाख कोटी रुपये झाले आहे.

२०१८-१९ साठी निश्चित केलेल्या एकूण ११.५० लाख कोटी रुपयांच्या प्रत्यक्ष कर संकलन उद्दीष्टाच्या तुलनेत सध्याचे नक्त प्रत्यक्ष कर संकलन ६४.७ टक्के आहे. ढोबळ कंपनी कर संकलन १४.८ टक्के तर व्यक्तिगत प्राप्तीकर संकलनाचे प्रमाण १७.२ टक्के नोंदले गेले आहे. कंपनी अग्रिम कराच्या वृद्धीचा वेग १२.५ टक्के तर व्यक्तिगत अग्रिम कराचे प्रमाण २३.८ टक्के राहिले आहे.

सरकारने २०१८-१९ या चालू संपूर्ण आर्थिक वर्षांसाठी ११.१६ लाख कोटी रुपयांच्या अप्रत्यक्ष कराचे लक्ष्य राखले आहे.

विस्तारलेली वस्तू व सेवा कराची मात्र व भरपाई अधिभार यामुळे हे उद्दीष्ट पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.