सेन्सेक्स, निफ्टीत किरकोळ घसरण

मुंबई  : जागतिक भांडवली बाजारातील हालचालींवर प्रतिक्रिया देताना येथील प्रमुख दोन्ही निर्देशांक शुक्रवारीही घसरतेच राहिले. शेवटच्या तासाभरात समभाग विक्रीचा दबाव अधिक राहिल्याने सेन्सेक्ससह निफ्टीने सप्ताहअखेर घसरणीसह नोंदवली.

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स गुरुवारच्या तुलनेत ६६.२३ अंश घसरणीसह ५२,५८६.८४ वर स्थिरावला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १५.४० अंश घसरणीने १५,७६३.०५ पर्यंत येऊन थांबला.

चालू सप्ताहात मुंबई निर्देशांक ३८८.९६ अंशांनी तर निफ्टी ९३ अंशांनी घसरला आहे. साप्ताहिक तुलनेत त्यातील घसरण प्रत्येकी पाऊण व अध्र्या टक्क्याची आहे.

सेन्सेक्समध्ये बजाज फायनान्सचे समभाग मूल्य सर्वाधिक, जवळपास २.५ टक्क्यांनी घसरले. तसेच बजाज फिनसव्‍‌र्ह, स्टेट बँक, टाटा स्टील, टायटन कं पनी, एशियन पेंट्स, अ‍ॅक्सिस बँक आदीही काही प्रमाणात घसरले. मुंबई निर्देशांकातील सन फार्मा थेट १० टक्क्यांपर्यंत झेपावला. तर टेक महिंद्रने त्याचा वर्षांतील सर्वोच्च स्तर शुक्रवारी गाठला. पॉवरग्रिड, बजाज ऑटो, एचसीएल टेक, महिंद्र अँड महिंद्र, एनटीपीसीही ७ टक्यांपर्यंत वाढले.

क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये पोलाद, ऊर्जा, बँक, तेल व वायू, भांडवली वस्तू प्रत्येकी जवळपास एक टक्क्यापर्यंत खाली आले. तर आरोग्यनिगा, बहुपयोगी वस्तू, वाहन, ग्राहकोपयोगी वस्तू निर्देशांक किरकोळ वाढले.

मुंबई शेअर बाजारातील मिड कॅ प व स्मॉल कॅ प प्रत्येकी ०.६९ टक्क्यापर्यंत वाढले.

आशियातील बाजारांची सप्ताहअखेर काही अंशांच्या निर्देशांक घसरणीने झाली. तर युरोपीय बाजारातील प्रमुख निर्देशांकदेखील दुपारच्या सत्रापर्यंत निराशाजनक कामगिरीच करत होते.