सणांची साथ आणि नव्या वर्षांत वाढणाऱ्या किंमती हे भारतीय वाहन उद्योगाच्या पथ्यावर पडले आहे. देशांतर्गत प्रवासी कार विक्री डिसेंबरमध्ये १३ टक्क्य़ांनी वाढली आहे. क्षेत्राने सलग १४ व्या महिन्यात विक्री वाढीची कामगिरी बजाविली आहे.
२०१५ मधील सणांचा मोसम तसेच जानेवारी २०१६ पासून वाहनांच्या किंमती या पाश्र्वभूमीवर डिसेंबर २०१५ मध्ये खरेदीदारांकडून वाहनांना प्रतिसाद मिळाला. ‘सिआम’ने सोमवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील प्रवासी कारची विक्री गेल्या महिन्यात वार्षिक तुलनेत १२.८७ टक्क्य़ांनी वाढून १,७२,६७१ वर गेली आहे.
ऑक्टोबरपासून सुरू झालेला भारतीय बाजारपेठेतील सणांचा मोसम अगदी ख्रिसमसपर्यंत कायम होता. त्यातच अनेक कंपन्यांनी नव्या वर्षांत वाहनांच्या किंमती वाढविण्याचे स्पष्ट केल्याने खरेदीदारांची घाई झाली. सोबत कंपन्यांमार्फत दिले जाणाऱ्या सूट-सवलतीची जोडही कायम होती.
याचा परिणाम डिसेंबर २०१४ मधील १,५२,९८६ च्या तुलनेत यंदाच्या डिसेंबरमध्ये वाहन विक्री वाढली. तसेच एकूण प्रवासी वाहन विक्री १०.४६ टक्क्य़ांनी वाढून २,३०,९६० झाली. यामध्ये निर्यातीचाही समावेश आहे. वर्षअखेर अर्थव्यवस्था रुळावर येत असल्याचे हे निर्देश असल्याची प्रतिक्रिया वाहन उत्पादकांची संघटना सिआमने दिली आहे. या जोरावर चालू एकूण आर्थिक वर्षांत या उद्योगाची वाढ ६ ते ८ टक्के राहण्याचा आशावादही व्यक्त करण्यात आला आहे.
देशांतर्गत प्रवासी कार विक्रीचा जोर असाच कायम राहिला तर विक्री वाढ १० टक्क्य़ांपुढे जाण्याची शक्यता आहे. याला निमित्त फेब्रुवारीत नोएडा येथे होणाऱ्या वाहन मेळ्याचे सांगण्यात येते. दर दोन वर्षांनी होणारा हा मेळा आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यासाठी अनेक कंपन्यांनी त्यांची नवी वाहने बाजारात दाखल करण्याची तयारीही पूर्ण केली आहे. पैकी अनेक कंपन्यांनी त्यांच्या नव्या वाहनांची नावे तसेच त्याचे रुप गुलदस्त्यात ठेवले आहे.
डिसेंबरमध्ये तुलनेत मोटरसायकल विक्री मात्र ५.९३ टक्क्य़ांनी घसरून ७,२४,८०७ झाली आहे. तर स्कूटर विक्रीही वाढली आहे. एकूण दुचाकी विक्री मात्र ३.१० टक्क्य़ांनी घसरली आहे. व्यापारी वाहनांचा प्रवास यंदा दुहेरी आकडय़ात विस्तारला आहे. ११.४५ टक्के वाढीसह डिसेंबरमधील एकूण व्यापारी वाहन विक्री ५६,८४० झाली आहे. विविध गटातील सर्व वाहनांच्या विक्रीत किरकोळ वाढ झाली आहे.
जानेवारी २०१६ पासून अनेक कंपन्यांच्या विविध वाहनांच्या किंमतीत ३ ते ५ टक्क्य़ांपर्यंत वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील चलन फेरबदलामुळे कंपन्यांनी त्यांचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. त्यामुळे मारुती सुझुकी, ह्य़ुंदाई मोटर तसेच मर्सिडिज बेन्झ, बीएमडब्ल्यू आदी कंपन्यांनी जानेवारीपासूनच किंमती वाढविल्या आहेत. तर टाटा मोटर्सने तिची किंमत वाढ १ जानेवारीऐवजी आठ दिवस पुढे ढकली आहे.

अनेक कंपन्यांच्या सूट – सवलती अद्याप कायम असून काही कंपन्या महिन्याच्या पहिल्या पंधरवडय़ापर्यंत किंमतवाढ लागू करतील.
भारतीय वाहन उद्योगासाठी वर्षांचा शेवटचा महिना नेहमीच आव्हानात्मक राहिला आहे. मात्र यंदा वाहन उत्पादक कंपन्यांना हायसे झाल्याची संधी मिळाली आहे. कार विक्रेत्या कंपन्यांनी त्यांच्या विविध उत्पादनांवर दिलेल्या सवलतींचाही एक परिणाम आहेच.
– सुगातो सेन, उप महासंचालक, सिआम.