मुंबई : करोना प्रतिबंधक लसीची मात्रा घेतली असेल तर आरोग्य विमा योजनेच्या खरेदी तसेच नूतनीकरण हप्त्याच्या रकमेवर ५ टक्क््यांची सवलत देण्याची घोषणा रिलायन्स जनरल इन्शुरन्स या कंपनीने केली आहे. कंपनीच्या ‘हेल्थ इन्फिनिटी’ या योजनेसाठी ही सवलत योजना म्हणजे, करोनाविरूद्ध लढ्यात योगदान आणि लसीकरणाला प्रोत्साहनच दिले जाईल, असा कंपनीचा दावा आहे. देशातील कोणत्याही विमा कंपनीकडून टाकले गेलेले हे अशा प्रकारचे पहिले पाऊल आहे.

रिलायन्स जनरल इन्शुरन्सचे मुख्याधिकारी राकेश जैन यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, विमा नियंत्रक ‘इर्डा’नेही कंपनीच्या हेल्थ इन्फिनिटी योजनेवरील या सवलतीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

लसीचा केवळ एक डोस घेतलेले नवीन ग्राहक आणि पॉलिसीचे नूतनीकरण करीत असलेले विद्यमान विमाधारकही या मर्यादित काळासाठी लागू असलेल्या योजनेसाठी पात्र ठरतील, असे ते म्हणाले.