भारतभरातील क्रीडाप्रेमींसाठी जगभरातील सर्वात मोठय़ा व सर्वोत्तम खेळविषयक घटनांच्या प्रक्षेपणाच्या कटिबद्धतेतून डिस्कव्हरी कम्युनिकेशन्सने भारतात नवीन क्रीडा वाहिनी ‘डीस्पोर्ट’च्या अनावरणाची सोमवारी घोषणा केली. गत १० वर्षांत कोणत्याही माध्यम कंपनीने भारतीय बाजारपेठेत दाखल केलेली ही पहिलीच क्रीडा वाहिनी आहे.

नवीन वाहिनीतून गत २० वर्षांपासून भारतातील डिस्कव्हरीचे योगदान आणखी विस्तारेल असा दावा डिस्कव्हरी नेटवर्क्‍स एशिया पॅसिफिकचे वरिष्ठ उपाध्यक्ष व महाव्यवस्थापक करण बजाज यांनी केला. दोन दशकांपेक्षा अधिक काळापासून वैशिष्टय़पूर्ण अशा वाहिन्यांच्या समृद्ध दालनासह डिस्कव्हरी भारतीय प्रेक्षकांचे मनोरंजन करीत आहे. डीस्पोर्टच्या शुभारंभासह आपल्या वाढत्या विस्तारामध्ये आणखी एका नाममुद्रेला जोडताना अतिशय समाधानाची जाणीव होत असल्याचे त्यांनी सांगितले. डीस्पोर्टद्वारे देशभरातील प्रेक्षकांना दररोज १० तासांपेक्षा जास्त थेट खेळ स्पर्धाचे कार्यक्रम बघायला मिळतील. वाहिनीसाठी कंटेंट मिळविण्यासाठी ईएसपीएन-स्टारचे माजी व्यवस्थापकीय संचालक आणि डिश टीव्ही इंडियाचे माजी मुख्याधिकारी आर. सी. व्यंकटेश डीस्पोर्टच्या सेवेत सामील झाले आहेत.