मुंबईतील पीक विमा योजनेवरील चर्चासत्रात अर्थमंत्री अरुण जेटली यांचे प्रतिपादन

देशाच्या अर्थविकासाला चालना देण्यासाठी तसेच दारिद्रय़ निर्मूलनाकरिता कृषी क्षेत्राची वाढ वेगाने होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मंगळवारी मुंबईत केले.
नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात प्रस्तावित करण्यात आलेल्या पंतप्रधान पीक विमा योजनेवरील चर्चासत्रात ते बोलत होते. नाबार्डचे अध्यक्ष हर्ष कुमार भानवाला हे यावेळी उपस्थित होते. अर्थमंत्री म्हणाले की, देशाची प्रगती वेगाने होणे गरजेचे आहे. त्यातच कृषी क्षेत्राने हा प्रवास जलद केला, तर भारतातील गरिबीचे खऱ्या अर्थाने उच्चाटन होईल. कृषी हे भारतीय अर्थव्यवस्थेकरिता काहीशी किचकट बाब आहे. गेल्या सलग दोन मान्सूनने पाठ फिरविली आहे. यंदाही पाऊस कमी झाला तर एकूणच कृषी रचना आपल्याला तपासून पाहावी लागेल.
जेटली यांनी यावेळी सांगितले की, नव्या पीक विमा योजनेच्या माध्यमातून कृषी क्षेत्रावरील ताण काहीसा हलका केला जाईल. या क्षेत्रासाठीच्या आधीच्या योजनांपेक्षा ही योजना पूर्णत: भिन्न आहे.
आधीच्या योजनेनुसार ही योजना शेतकऱ्यांनी घेतलेल्या बँक कर्जाच्या संरक्षणावर भर देण्याऐवजी नवी योजना पिकावर परिणाम करणाऱ्या घटकाबरोबरच शेतकऱ्यांचेही हित लक्षात घेईल.
एखाद्या शेतकऱ्याचे पीक नुकसान झाल्यास त्याला किमान विमा हप्त्याच्या बदल्यात वाढीव भरपाई मिळण्याची सुविधा यात आहे, असेही जेटली यांनी या योजनेचा उल्लेख करत सांगितले. बँकांकडून कर्ज घेणाऱ्या एकूण शेतकऱ्यांपैकी निम्मे तरी या योजनेचा लाभ घेतील, असा विश्वास अर्थमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. सध्या अशा योजनेचे केवळ २० टक्के शेतकरी लाभार्थीच असल्याची माहिती याप्रसंगी देण्यात आली.
मतभेद नाहीत..!
रिझव्‍‌र्ह बँक आणि तिचे गव्हर्नर यांच्याबरोबर अर्थमंत्रालयाचे कसलेच मतभेद नाहीत, याची जेटली यांनी पुनरूक्ती केली. अर्थव्यवस्थेबाबत दोन्ही यंत्रणा एकाच मार्गावर आहेत. केवळ कारस्थानाच्या कथांबाबत आपल्या राष्ट्रीय प्रेमातून विसंवादाच्या वार्ता अधूनमधून पुढे येतात. नवी दिल्लीतील नॉर्थ ब्लॉकमधील अर्थ मंत्रालय आणि मुंबईतील मिंट स्ट्रीटवरील रिझव्‍‌र्ह बँक या दोन्ही यंत्रणा एक जबाबदार संस्था आहेत. राजन यांच्या गव्हर्नरपदाची मुदत ३ सप्टेंबरला समाप्त होत आहे, मुदतवाढ मिळेल काय या संबंधाने आताच काही भाष्य करणे चुकीचे ठरेल, असे जेटली यांनी सोमवारी ज्येष्ठ पत्रकार शेखर गुप्ता व बरखा दत्त यांच्या ‘द प्रिंट’ या नव्या माध्यम उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी बोलताना स्पष्ट केले.