भारतासह जगभरात ३८ देशांमध्ये बँका, ट्रक निर्मिते ते वंगण तयार करणाऱ्या कंपनी असे उद्योग साम्राज्य पसरलेल्या हिंदुजा बंधूमधील कलह लंडनच्या न्यायालयात कायदेशीर निवाडय़ासाठी दाखल झाला असून, यातून ११ अब्ज अमेरिकी डॉलरच्या संपत्तीवरील मालकीचा प्रश्न पणाला लागला आहे.

श्रीचंद, गोपीचंद, प्रकाश आणि अशोक या चार हिंदुजा बंधूंनी २०१४ मध्ये एका करारावर स्वाक्षरी केली आहे. त्यायोगे एका भावाकडे असलेल्या मालमत्तेवर इतर भावांची सारखीच मालकी असेल आणि प्रत्येकजण दुसऱ्या बंधूंना निष्पादक/विश्वस्त म्हणून नियुक्त करेल, असा त्या कराराचा अर्थ होता. स्वित्झर्लंडमधील या समूहाच्या ताब्यातील हिंदुजा बँकेच्या नियंत्रणावरून हिंदुजा बंधूमध्ये मतभिन्नता वाढत जाऊन, त्याने आता न्यायालयीन कज्जाचे रूप धारण केले आहे. १९९४ मध्ये स्थापित या बँकेव्यतिरिक्त या समूहाची भारतात इंडसइंड बँक स्वित्झर्लंडस्थित बँक मालमत्ता थोरले बंधू श्रीचंद हिंदुजा (वय ८४ वर्षे) यांच्या एकटय़ाच्या नावावर असून, गोपीचंद, प्रकाश आणि अशोक या अन्य हिंदुजा बंधूनी २०१४ च्या कराराचा हवाला देत त्यावर आक्षेप घेतला आहे.

आता श्रीचंद आणि त्यांची मुलगी विनू यांनी या कराराला ‘कायदेशीर वैधता’ नसल्याची भूमिका घेतली आहे. २०१६ साली श्रीचंद यांनी कुटुंबाच्या संपत्तीच्या विभाजनाची इच्छाही व्यक्त केली आहे. २०१४ सालचा करार रद्दबातल केला जाऊ शकतो, अशी मागणी करणारा अर्ज त्यांनी न्यायालयापुढे केला आहे. स्वित्झर्लंडस्थित हिंदुजा बँकेवर श्रीचंद यांची दुसरी कन्या शानू हिंदुजा अध्यक्षस्थानी आहे, तर पुत्र करम याची गेल्याच आठवडय़ात मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

पूर्वेतिहास वादग्रस्त

बोफोर्स तोफा प्रकरणात कमिशनरूपी मलिदा खाल्ल्याचा आरोप १९८० साली श्रीचंद, गोपीचंद आणि प्रकाश या तीन हिंदुजा बंधूंवर झाले आहेत. तथापि न्यायालयात हे आरोप सिद्ध होऊ शकले नाहीत आणि तिन्ही बंधूंची निर्दोष सुटका करण्यात आली. परंतु या खटल्यासमयी या बंधूंमध्ये दिसून आलेली एकजूट आता मात्र संपुष्टात आल्याचे दिसून येते.

समभागांमध्ये घसरण

हिंदुजा कुटुंबियांच्या मालकीच्या अनेक कंपन्यांमध्ये भांडवली बाजारात सूचिबद्ध अशोक लेलँड, इंडसइंड बँक आणि गल्फ ऑइल या तिन्ही कंपन्यांच्या समभागांवर, कौटुंबिक कलहाच्या वाच्यतेने गुरुवारच्या व्यवहारात नकारात्मक परिणाम दिसून आला. समभागांचे मूल्य एक ते दीड टक्क्य़ांनी गडगडले.