भारताच्या अर्थव्यवस्थेत सकारात्मक वाढ आता फार दूर नसल्याचे रिझव्‍‌र्ह बँकेने म्हटले आहे. अर्थव्यवस्थेतील ही फेरउभारी इंग्रजी आद्याक्षर ‘व्ही’ आकाराची आहे, पण यातील ‘व्ही’ हे ‘व्हॅक्सिन’साठी म्हणजे करोना प्रतिबंधक लशीसाठी वापरण्यात आले असल्याची पुस्तीही तिने जोडली आहे.

रिझव्‍‌र्ह बँकेच्या नियतकालिक पत्रिकेच्या जानेवारी महिन्याच्या अंकात, २०२१ सालात अर्थव्यवस्थेची स्थिती कशी असेल, या विषयावरील लेखात, अर्थव्यवस्थेत सकारात्मक वाढीच्या दिशेने फेरबदल हाकेच्या अंतरावर असल्याचा दावा करण्यात आला आहे. ही उभारी देशात १६ जानेवारीपासून सुरू झालेल्या जगातील सर्वात मोठय़ा कोविड-प्रतिबंधक लसीकरण मोहिमेच्या परिणामी असेल, असे या लेखात रिझव्‍‌र्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर मायकेल देवव्रत पात्रा यांनी त्याचे लेखक या नात्याने प्रतिपादन केले आहे. त्यांच्या मते, लसीकरण मोहिमेचे सुयश हे अर्थव्यवस्थेच्या जोखीम संतुलित वाढीचा प्रत्यय देणारे असेल. रिझव्‍‌र्ह बँकेकडून मात्र लेखाखालील अस्वीकृतीच्या तळटीपेत, लेखात व्यक्त करण्यात आलेली मते ही लेखकाची वैयक्तिक मते असून, मध्यवर्ती बँकेच्या भूमिकेचे ते प्रतिनिधित्व करीत नसल्याचे म्हटले आहे.

लेखात असेही म्हटले गेले आहे की, आगामी २०२१-२२ च्या पहिल्या सहामाहीत सकल राष्ट्रीय उत्पादन अर्थात जीडीपीच्या वाढीला आधीच्या वर्षांतील तळ गाठलेल्या आकडेवारीने पुष्टी मिळेल आणि ग्राहक उपभोगात वाढीचेही त्यात सुपरिणाम दिसून येतील. बरोबरीने हंगाम पूर्ण होण्याआधीच रबीच्या पेऱ्यांमध्ये दिसून आलेली लक्षणीय वाढ पाहता, २०२१ हे बंपर कृषी उत्पादनाचे वर्ष ठरेल.

लस निर्मितीसाठी भारत ही जगाची राजधानी ठरेल आणि जगभरात सर्वत्र लसीकरण मोहीम सुरू झाल्यामुळे, भारतातून औषधी निर्यातीला सबळ वेग आणि मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे. कृषी क्षेत्रातून बंपर उत्पादनासह निर्यातीची स्थिती उत्तम आहे आणि केंद्र सरकारने नुकत्याच दिलेल्या उत्पादनसंलग्न प्रोत्साहन (पीएलआय) योजनेतून अन्न प्रक्रिया उद्योगाला दिलेले प्राधान्य पथ्यावर पडेल, असे हा लेख सांगतो.

अर्थसंकल्पाकडून ‘संकटात संधी’ची आस

अर्थव्यवस्थेला ज्या प्रकारचे घाव सोसावे लागले ते भरून येऊन बरे व्हायला वर्षांनुवर्षे खरे तर लागतील. परंतु नावीन्यपूर्ण पद्धतीने ते हाताळले गेल्यास करोना साथीचे संकट हे संधीमध्ये रूपांतरित होऊ शकेल. आठवडाभरावर आलेला केंद्रीय अर्थसंकल्प हे त्या दिशेने महत्त्वाचे ठरेल, असा आशावादही मायकेल पात्रा यांनी या लेखातून व्यक्त केला आहे.