राज्यातील नागपूर, वर्धा आणि बुलढाणा या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचा रिझव्‍‌र्ह बँकेकडून बँकिंग परवाना अर्ज फेटाळला जाण्याचा मुद्दा ताजा असतानाच, प्रत्यक्षात राज्यातील ३१ पैकी २८ जिल्हा बँका नफ्यात असून, त्यातील २० बँकांची आर्थिक स्थिती उत्तम असल्याचा निर्वाळा खुद्द ‘राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (नाबार्ड)’ ने आपल्या अहवालातून दिला आहे.
जिल्हा बँकांना पुनर्वित्त देण्याबरोबर त्यांच्यावर विकासाबाबत देखरेख ठेवणाऱ्या ‘नाबार्ड’ने सध्याच्या आव्हानात्मक स्थितीतही चांगली कामगिरी करून राज्यातील सर्वसामान्य, शेतकरी आणि कष्टकरी वर्गासाठी योगदान देणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या कामगिरीचे कौतुक या अहवालात केले आहे. राज्यातील ३१ जिल्हा बँका आणि राज्य सहकारी बँकेचे मुख्य कार्याधिकाऱ्यांची सहामाही आढावा बैठक नुकतीच पुण्यात पार पडली, त्यावेळी नाबार्डने आपला हा अहवाल प्रस्तुत केला आहे. राज्यातील ११ जिल्हा बँकांचा संचित तोटा अधिक असला तरी चांगल्या आर्थिक स्थितीत २० जिल्हा बँकांनी त्यावर मात केली असल्याचे नाबार्डने म्हटले आहे.
मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे आणि पुणेसहित २० जिल्हा बँकांना गुणवत्तेचा शेरा नाबार्ड दिला आहे. नक्त थकीत कर्जे (एनपीए), भांडवली पर्याप्तता, नक्त नफा असे प्रमुख निकष आणि संचित तोटा नसलेल्या बँकांची बँकिंग नियामक कायदा आणि राज्याचा सहकार कायद्याच्या अधीन राहून अटी-शर्तीचे पालन करून उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या जिल्हा बँकांची ‘नाबार्ड’ने आपल्या अहवालात वर्गवारी केली आहे.
*गुणवत्तेचा शेरा मिळविणाऱ्यांत रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे, पुणेसह मुंबई जिल्हा बँकही!