17 December 2017

News Flash

सोने मागणी दिवाळीला वाढणार

सोने खरेदीचा एक मुहूर्त असलेली धनत्रयोदशी येत्या १७ ऑक्टोबर रोजी आहे.

व्यापार प्रतिनिधी, मुंबई | Updated: October 10, 2017 3:15 AM

मागणी २० टक्के वाढण्याचा अंदाज

ऐन दिवाळीत सोने मागणी वाढण्याबाबतचा विश्वास सराफ वर्तुळातून व्यक्त केला जात आहे. आठवडय़ावर येऊन ठेपलेल्या या दिवाळीत सोने विक्री गेल्या वर्षीच्या तुलनेत २० टक्क्य़ांनी वाढण्याचा अंदाज बांधला जात आहे.

सोने खरेदीचा एक मुहूर्त असलेली धनत्रयोदशी येत्या १७ ऑक्टोबर रोजी आहे. यंदाच्या दिवाळीला सोने खरेदीसाठी पूरक वातावरण असल्याचे ‘ऑल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी फेडरशेन’चे अध्यक्ष नितीन खंडेलवाल यांनी म्हटले आहे.

कमी दर असूनही यंदाच्या दसऱ्याला मौल्यवान धातूला फारशी मागणी नव्हती. उलट गेल्या वर्षीच्या दसऱ्याच्या तुलनेत यंदाच्या मुहूर्ताला कमी सोने विक्री झाली अशी माहिती पु. ना. गाडगीळ सन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित मोडक यांनी दिली.

वस्तू व सेवा कर परिषदेच्या गेल्या शुक्रवारी नवी दिल्लीत झालेल्या २२ व्या बैठकीत २ लाख रुपयेर्पयंतच्या किंमतीच्या दागिने खरेदीकरिता आता पॅन तसेच आधार अनिवार्य करण्याचा निर्णय झाला. खरेदीदारांकरिता या माध्यमातून झालेली सुलभता तसेच सध्या मौल्यवान धातूचे असलेले किमान स्तरावरील दर यंदाच्या दिवाळसण खरेदीला पूरक ठरतील, असा विश्वास सराफ वर्तुळातून व्यक्त करण्यात आला.

सप्टेंबरमध्ये देशाची सोने आयातही रोडावली होती. गेल्या महिन्यात ४३ टक्के कमी सोने आयात झाली. सोने खरेदीबाबत असलेल्या अटींमुळे सराफा व्यापाऱ्यांनी सोने मागणी कमी नोंदविली होती.

वस्तू व सेवा कर परिषदेने केलेल्या सुलभतेमुळे सोने खरेदीचा ग्राहकांचा कल यंदा वाढण्याचा विश्वास वामन हरी पेठे ज्वेलर्सचे संचालक आदित्य पेठे यांनी व्यक्त केला आहे. येणाऱ्या दिवाळीला यामुळे सराफा बाजारात सकारात्मक वातावरण तयार होईल, असेही ते म्हणाले.

यंदाच्या सण निमित्ताने मलाबार गोल्ड अँड डायमंड्सकडून १०० किलो सोन्याच्या भेटवस्तू उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर ५ किलो सोन्याचे व्यक्तिगत स्तरावरील बक्षीसाची संधीही खरेदीदारांना देण्यात आली आहे.

वस्तू व सेवा कर अंतर्गत ५०,००० रुपयांवरील दागिने खरेदीसाठी पॅन कार्ड अनिवार्यतेची मर्यादा विस्तारित केल्याचे स्वागत सोमवारी भांडवली बाजारातही झाले.

First Published on October 10, 2017 3:15 am

Web Title: diwali 2017 gold demand will increase