२०१४-१५ या आर्थिक वर्षांत उत्तम कामगिरी नोंदविल्याबद्दल डोंबिवली नागरी सहकारी बँकेला ‘अ’ वर्गाचा दर्जा प्राप्त झाला आहे. त्याचबरोबर २०१३-१४ आर्थिक वर्षांतील महाराष्ट्र को-ऑप. बँक्स फेडरेशनचा ‘सर्वोत्तम बँक’ श्रेणीतील द्वितीय क्रमांकाचा पुरस्कारही बँकेला प्राप्त झाला असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष उदय कर्वे यांनी दिली.
बँकेविषयी ते म्हणाले, २०१४-१५ या आर्थिक वर्षांत बँकेच्या ठेवी १९ टक्क्यांनी वाढून ३ हजार ६८८ कोटींच्या झाल्या आहेत. बँकेचा कर्जव्यवहार २८ टक्क्यांनी वाढून २ हजार ७२७ कोटींवर पोहोचला आहे. एकूण व्यवसायात २३ टक्क्यांनी वाढ झाली असून तो ६ हजार ४१५ कोटींचा झाला आहे. बँकेच्या निव्वळ नफ्यात यंदा ३५ कोटींची वाढ झाली आहे. भागभांडवलात २८ टक्क्यांची भर पडली असून मार्च २०१५ अखेरीस बँकेचे भागभांडवल ९४ कोटींपेक्षा अधिक झाले असल्याचेही त्यांनी सांगितले. बँकेचा योग्य कारभार पाहूनच डोंबिवली नागरी सहकारी बँकेला नव्या चार बँका सुरू करण्यास परवानगी दिल्याचेही कर्वे यांनी सांगितले. बँकेचे सरव्यवस्थापक गोपाळ परांजपे यानी बँकेचा आर्थिक घडामोडीचा आढावा घेऊन नव्या योजनांची माहिती दिली.