कतारमधील दुसरी मोठी बँक असलेल्या दोहा बँकेने मुंबईतील नरिमन पॉइंटस्थित रहेजा सेंटर येथील पहिल्या शाखेचा बुधवारी समारंभपूर्वक उद्घाटनासह भारतात पदार्पण केले. गेल्या डिसेंबरमध्येच रिझव्‍‌र्ह बँकेने शाखा सुरू करण्याची बँकेला परवानगी दिली होती, परंतु दक्षिण मुंबईत पसंतीची जागा शोधताना विलंब झाल्याचे सांगण्यात आले.
या शाखेच्या औपचारिक ई-उद्घाटनानिमित्त हॉटेल ट्रायडन्ट येथे आयोजित समारंभाला केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, कतारचे अर्थमंत्री अली शेरिफ अल इमादी, कतार मध्यवर्ती बँकेचे गव्हर्नर शेख बिन साऊद अल थानी आणि दोन्ही देशांतील उद्योगक्षेत्रातील अनेक नामवंतांची उपस्थिती होती.
वरिष्ठ व्यवस्थापकीय संघासह ५० कर्मचाऱ्यांच्या चमूद्वारे दोहा बँकेने भारतात कार्यान्वयन सुरू केले असून, दुसरी शाखा कोची, केरळ येथे बुधवारीच सुरू करण्यात आली आहे. उल्लेखनीय म्हणजे या विदेशी बँक समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर. सीतारामन यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, कॉर्पोरेट तसेच व्यक्तिगत ग्राहक दोहोंना लक्ष्य करून दोहा बँकेकडून सेवा व योजना प्रदान केल्या जाणार आहेत. विदेशी बँकांना शाखा विस्तारासाठी दिली जाणारी परवानगी ही दोन देशांतील परस्पर आदानप्रदानाच्या मात्रेनुसार ठरत असल्याने, दोहा बँकेला त्या आधारेच रिझव्‍‌र्ह बँकेकडून शाखाविस्ताराची परवानगी मिळेल.
दोहा बँकेला भारतातील व्यवसायाबाबत मोठय़ा आशा असून, पुढील तीन वर्षांत ५ अब्ज डॉलरच्या म्हणजे ३००० कोटी रुपयांच्या व्यवसायाचे उद्दिष्ट बँकेने राखले असल्याचे आर. सीतारामन यांनी सांगितले.