दसरा-दिवाळीच्या सणाने यंदा वाहन उद्योगाला फारसे तारलेले नाही. उलट गेल्या महिन्यात प्रवासी वाहन विक्री नकारात्मक स्थितीत नोंदली गेली. देशातील एकूण प्रवासी कार विक्री ऑक्टोबरमध्ये २.५५ टक्क्य़ांनी रोडावली असून सलग दुसऱ्या महिन्यात ही विक्री रुंदावली आहे.
ऑक्टोबरमध्ये १,५९,०३६ प्रवासी कारची विक्री भारतात झाली. ऑक्टोबर २०१३ मधील १,६३,१९९ कार विक्रीपेक्षा ती कमी आहे.
‘सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चर्स’ (सिआम) या वाहन उत्पादक संघटनेने सोमवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, आघाडीच्या मारुती सुझुकीने अवघी १.९५ टक्के विक्री वाढ राखली.
संघटनेचे उपसंचालक सुगातो सेन यांच्या अंदाजानुसार, वाहन विक्री आणखी एक-दोन महिने घसरती राहण्याची शक्यता आहे.
२०१५ पासून कदाचित विक्री पूर्वपदावर दिसू शकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. विद्यमान एकूण आर्थिक वर्षांत विक्री ५ टक्क्य़ांपर्यंत वाढू शकेल, असेही ते म्हणाले.
चालू आर्थिक वर्षांत मे ते ऑगस्ट या दरम्यान वाहन उद्योगाने विक्रीतील वाढ राखली आहे, तर सप्टेंबरमध्ये या उद्योगाने १.०३ टक्के घसरण नोंदविली होती.
महिंद्र, टाटासारख्या आघाडीच्या कंपन्यांनाही गेल्या महिन्यात विक्रीतील घसरणीला सामोरे जावे लागले, तर मोटरसायकल विभागाने ऑक्टोबरमध्ये ८.७३ टक्के घसरण नोंदविली. गेल्या महिन्यात बाईक विक्री १०,०८,७६१ झाली.
यंदाच्या ऑक्टोबर-नोव्हेंबरचा विक्री कल गेल्या वर्षीच्या तुलनेत बदलण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये मोटरसायकल विक्री उंचावली होती; उलट नोव्हेंबरमध्ये ती घसरली होती. यंदा हे चित्र नेमके उलटे होण्याची शक्यता संघटनेने व्यक्त केली आहे.
स्कूटर विक्रीतील वाढ गेल्या महिन्यात दुहेरी आकडय़ात १०.८९ टक्के राहिली आहे. एकूण दुचाकी मात्र ३.६१ टक्क्य़ांनी घसरली आहे.
मंदीतून सावरण्यासाठी वाहन उद्योगाला दिलेली उत्पादन शुल्क सवलत येत्या डिसेंबपर्यंत लागू आहे. यानंतर वाहनांच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे.