घटलेल्या मागणीपायी प्रसंगी उत्पादनकपात जारी करावी लागणाऱ्या भारतीय वाहन उद्योगाची चाल सलग आठव्या महिन्यात मंदावली आहे. जूनमध्ये देशांतर्गत प्रवासी कारची विक्री नऊ टक्क्यांनी कमी झाली आहे, तर मध्यम व अवजड व्यापारी वाहनांनीही सलग १६व्या महिन्यांत विक्रीतील घटता क्रम कायम राखला आहे. चालू आर्थिक वर्षांच्या एप्रिल-जून या पहिल्या तिमाहीत देशांतर्गत एकूण वाहनविक्री २.१० टक्क्यांनी कमी झाली आहे. या पाश्र्वभूमीवर उत्पादकांच्या संघटनेने यंदा या क्षेत्राच्या भविष्याबाबत अंदाज बांधणाऱ्या संकेताबाबत तोंड बंद ठेवणे पसंत केले असून उलट उद्योग सावरण्यासाठी सरकारकडे सहकार्याचे आर्जव केले आहे. वाहन निर्मात्या कंपन्यांचे नेतृत्व करणाऱ्या ‘सियाम’ संघटनेचे महासंचालक एस. शांडिल्य यांनी या उद्योगाला २००८-०९ च्या आर्थिक मंदीप्रमाणे यंदाही सरकारकडून आर्थिक पॅकेजची अपेक्षा केली आहे. मात्र अद्याप सरकारशी थेट संपर्क साधण्यात आला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
* उत्पादन (जून)
सर्व वाहन कंपन्यांनी मिळून जूनमध्ये एकूण १६,१९,३२८ वाहनांची निर्मिती केली. गेल्या वर्षीच्या याच कालावधीपेक्षा ती ४.७३ टक्क्यांनी कमी आहे.
* प्रवासी वाहने  
तिमाहीत प्रवासी वाहनविक्रीत ७.२४ टक्के घसरण झाली आहे, तर कारची विक्री दुहेरी आकडय़ात (-१०.४१%) व व्हॅनची विक्री उणे ५.९७ टक्क्यांनी घटली आहे. बहुपयोगी वाहनांची विक्री मात्र अशा बिकट स्थितीतही कायम वाढती राहिली आहे. यंदाच्या तिमाहीत ती ५.२७ टक्क्यांनी वाढली आहे.
* दुचाकी वाहने :
दुचाकी वाहनविक्रीदेखील किरकोळ का होईना ०.८२ टक्क्यांनी घटली. यामध्ये मोटरसायकल व मोपेड यांची विक्री अनुक्रमे ३.९८ टक्के व ११.०६ कमी झाली आहे. गीअरलेस स्कूटरचा क्रम मात्र वधारता राहिला आहे.
* व्यापारी वाहने :
तिमाहीत व्यापारी वाहनांनी ८.१२ टक्क्यांपर्यंतची घसरण नोंदविली. मध्यम व अवजड व्यापारी वाहनांची विक्री तब्बल १५.५२ टक्क्यांनी खालावली, तर हलक्या व्यापारी वाहनांची विक्रीदेखील ३.९४ टक्क्यांनी कमी झाली आहे.
* निर्यात
तिमाहीत वाहन निर्यातही ५.६५ टक्क्यांनी खालावली असून प्रवासी वाहनांची निर्यात ३.५४ टक्क्यांनी, तर दुचाकींची निर्यात १२.५३ टक्क्यांनी कमी झाली आहे. केवळ तीन चाकी वाहन प्रकाराने भरघोस ५६.६२ टक्के वाढ राखली आहे.