एप्रिलमधील देशांतर्गत कार विक्रीत दोन टक्के वाढ

जानेवारी २०१६पासून सातत्याने घसरणारी प्रवासी कार विक्री गेल्या महिन्यात सावरली. एप्रिलमध्ये देशांतर्गत कार विक्री १.८७ टक्क्य़ांनी वाढली.
नव्या आर्थिक वर्षांच्या पहिल्याच महिन्यात अनेक कंपन्यांची नवी वाहने बाजारात दाखल झाल्याने त्याला मिळालेल्या प्रतिसादाच्या तेजावर वाहन उद्योगात पुन्हा चैतन्य पसरले आहे.
वाहन उत्पादकांची संघटना असलेल्या ‘सिआम’ने (सोसाईटी ऑफ ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चर्स) सोमवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, एप्रिलमध्ये देशातील प्रवासी कारची विक्री १,६२,५६६ वर गेली आहे. वर्षभरापूर्वी याच कालावधीत ती १,५९,५८८ होती.
एप्रिलमध्ये मारुती सुझुकीने बलेनो तर रेनो इंडियाने क्विड या हॅचबॅक श्रेणीतील वाहने सादर केली होती. एप्रिलमध्ये एकूण प्रवासी वाहन विक्री ११ टक्क्य़ांनी वाढली आहे. गेल्या महिन्यात ती वर्षभरापूर्वीच्या याच कालावधीतील २,१७,९८९ तुलनेत यंदा २,४२,०६० पर्यंत पोहोचली आहे. ह्य़ुंदाईची क्रेटा, मारुतीची ब्रेझा, महिंद्र अ‍ॅन्ड महिंद्रची केयूव्ही१०० या नव्या वाहनांनाही मिळालेल्या प्रतिसादाच्या जोरावर एकूण प्रवासी वाहन विक्री वाढली आहे.
बहुपयोगी वाहनांची विक्री एप्रिलमध्ये ४२.८२ टक्क्य़ांनी उंचावली आहे. वाहन क्षेत्रातील ही श्रेणी गेल्या ऑक्टोबरपासून सातत्याने वाढत असल्याचे निरीक्षण ‘सिआम’चे महासंचालक विष्णू माथूर यांनी नोंदविले आहे.
देशांतर्गत बाजारपेठेत एप्रिलमध्ये मारुतीने २.७२ टक्के वाढ, तर ह्य़ुंदाईने १०.५२ टक्के घसरण राखली होती. होन्डाची विक्रीही २०.१२ टक्क्य़ांनी घसरली होती. तर टाटा मोटर्स, रेनो यांनी अनुक्रमे २ टक्के व तिप्पट विक्री वाढ नोंदविली होती.
एप्रिल २०१६मध्ये दुचाकी क्षेत्रानेही भरीव कामगिरी बजाविली आहे. एकूण दुचाकी विक्री एप्रिलमध्ये २१.२३ टक्क्य़ांनी वाढली आहे. ती गेल्या महिन्यात १५.६० लाख झाली आहे. त्यात मोटरसायकल विक्री १६.२४ टक्क्य़ांनी उंचावत १०.२४ लाख झाली आहे. या गटातील वाढ ही सप्टेंबर २०१४ नंतर सर्वोत्तम राहिली आहे.
दुचाकी वाहन उत्पादकांमध्ये बजाज ऑटोने एप्रिलमध्ये २४.८४ टक्के तर हिरो मोटरसायकलने १४.८६ टक्के वाढ नोंदविली आहे. मोटरसायकलमध्ये हिरो मोटोकॉर्पच्या विक्रीत गेल्या महिन्यात १०.३० टक्के वाढ झाली आहे.
स्कूटर गटात एप्रिलने प्रतिसाद नोंदविला आहे. या महिन्यात एकूण ४.६८ लाख स्कूटर विकल्या गेल्या असून त्यांची वार्षिक तुलनेतील वाढ ही ३५.८५ टक्के आहे. या अव्वल होन्डाला ३३.१३ टक्के वाढ नोंदविता आली.
एप्रिलमध्ये व्यापारी वाहनांची विक्री १७.३६ टक्क्य़ांनी वाढून ५३,८३५ झाली.

२०१६-१७ च्या सुरुवातीलाच वाहन क्षेत्राला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या महिन्यात अनेक कंपन्यांनी त्यांची नवी वाहने बाजारपेठेत सादर केली. त्याला खरेदीदारांनी हात दिल्याचे यंदाच्या प्रवासी वाहन विक्रीवरून दिसून येते .
– विष्णू माथुर, महासंचालक, सिआम.