विक्रीत वाढीचा सलग १३ वा महिना
दिवाळी सणाच्या जोरावर भारतातील प्रवासी वाहन क्षेत्राने दुहेरी आकडय़ातील विक्रीतील वाढ नोंदविली असून नोव्हेंबरमधील ही सलग १३ व्या महिन्यांतील वाढ आहे. देशात विविध कंपन्यांची १,७३,१११ प्रवासी वाहने गेल्या महिन्यात विकली गेली असून वार्षिक तुलनेत हे प्रमाण १०.३९ टक्क्यांनी अधिक आहे.
वाहन उत्पादकांची संघटना असलेल्या ‘सिआम’ने शुक्रवारी दिलेल्या आकडेवारीनुसार, नोव्हेंबरमधील एकूण प्रवासी विक्री ११.४० टक्क्यांनी वाढून यंदा ती २,३६,६६४ झाली आहे. तर देशांतर्गत विक्रीनेही दुहेरी आकडय़ातील वाढ नोंदविली गेली. ऐन सणांमध्ये मारुती सुझुकी (बलेनो), रेनो (क्विड)सारखी नवीन वाहने दाखल झाली होती. सलग १३ व्या महिन्यातील वाढीमुळे उद्योग क्षेत्राने चालू वर्षांसाठी एकूण विक्रीत ८ ते १० टक्के वाढीची अपेक्षा केली आहे.
यंदा नोंदविलेली विक्रीतील वाढ सणांच्या जोरावर असली तरी ग्रामीण भागात अद्याप विक्री वाढलेली नाही, असे ‘सिआम’चे महासंचालक विष्णू माथूर यांनी सांगितले. काही प्रमाणातील स्कूटर व तुलनेत मोटारसायकल विक्रीने अद्यापही विक्रीतील प्रगती नोंदवली नाही असे ते म्हणाले.
देशात सर्व प्रकारच्या वाहनांची विक्री १६.५४ लाखांवर गेली असून त्यात ३.१८ टक्क्यांची वाढ झाली आहे. एकूण दुचाकी विक्री अवघ्या १.४७ टक्क्यांनी वाढून ती १३.२० लाखांवर गेली आहे. व्यापारी वाहनांची विक्री ८.५६ टक्क्यांनी वाढली आहे.