देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या भारतीय स्टेट बँकेची उपकंपनी असलेल्या एसबीआय कार्ड्स अ‍ॅण्ड पेमेंट्स सव्‍‌र्हिसेस लिमिटेडने गुरुवारी सप्टेंबरअखेर संपलेल्या तिमाहीत २०६ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावणारी कामगिरी केली. गत वर्षी याच तिमाहीतील ३८१ कोटी रुपये असलेला कंपनीचा निव्वळ नफा यंदा ४६ टक्क्य़ांनी घटलाच, परंतु अधिक गंभीर गोष्ट म्हणजे अनुत्पादित मालमत्ता (एनपीए) आणि त्यापोटी तरतुदीची मात्रा चिंताजनक पातळीवर गेली आहे.

कंपनीने ‘एनपीए’साठी यंदाच्या तिमाहीत ताळेबंदात केलेली तरतूद ८६२ कोटी रुपयांची आहे. नफ्यातील मोठा हिस्सा या एका घटकानेच गिळून टाकला आहे. गेल्या वर्षी जुलै-सप्टेंबर तिमाहीतील एनपीएपोटी तरतूद ही ३२९ कोटी रुपयांची होती. एकूण बुडीत कर्जाचे प्रमाण (ग्रॉस एनपीए) जून २०२० मधील १.२ टक्क्य़ांवरून ४.२९ टक्क्य़ांवर गेले आहे. कोविड-१९ आजारसाथीने निर्माण केलेल्या आर्थिक अनिश्चिततांचा हा परिणाम आहे, असे एसबीआय कार्ड्सने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने बँका आणि वित्तीय संस्थांना ३१ ऑगस्ट २०२० नंतर परतफेड थकलेल्या कर्ज खात्यांना ‘अनुत्पादित मालमत्ता (एनपीए)’ म्हणून वर्गीकृत करण्यास पुढील आदेश दिला जाईपर्यंत मनाई केली आहे. हा आदेश नसता तर एसबीआय कार्ड्सच्या एकूण एनपीएचे प्रमाण ७.४६ टक्क्य़ांवर गेले असते. न्यायालयाचा कर्ज हप्ते स्थगनासंबंधी निकाल लवकरच येईल. परतु पूर्वतयारी म्हणून आधीच वाढीव तरतूद ताळेबंदात करण्यात आली आहे, असे स्पष्टीकरण कंपनीने प्रसिद्धी पत्रकातून केले आहे.

संकटाचा पहिला प्रत्यय..

करोना संकटकाळाच्या जनसामान्यांना बसलेल्या आर्थिक झळांचे अस्सल चित्र, रिझव्‍‌र्ह बँकेने हप्ते स्थगितीची दिलेली मुभा आणि सर्वोच्च न्यायालयात त्या संबंधाने व्याजावर व्याज आकारणीच्या प्रलंबित प्रकरणांमुळे पुढे येऊ शकलेले नाही. परंतु बँका व वित्त क्षेत्राला याची मोठी किंमत मोजावी लागणार, याचा पहिला प्रत्यय एसबीआय कार्ड्सच्या तिमाही निकालांनी निश्चितच दिला आहे. आगामी काळात लक्षणीय वाढणाऱ्या थकबाकीची कंपनीने पूर्वतयारी म्हणून नफ्यात घट सोसून, ताळेबंदात मोठी आर्थिक तरतूद केली आहे.