मुंबई : सामान्य जनतेस करोना साथीसंबंधी माहिती प्राप्त व्हावी तसेच विविध प्रकारच्या उपाययोजनांचे मार्गदर्शन व्हावे या हेतूने सुरू केलेल्या आरोग्य सेतू अ‍ॅपचे व्यापारीकरण केले जात आहे आणि ऑनलाईन औषध विक्री करणाऱ्या ई-फार्मसी कंपन्यांना बेकायदेशीररित्या व्यासपीठ या अ‍ॅपच्या माध्यमातून उपलब्ध केले जात आहे, असा आरोप अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटना अर्थात ‘एआयओसीडी’ने केला आहे.

आत्मनिर्भर भारत घडविण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताज्या घोषणेच्या विरोधात जाणारे पाऊल असून, निती आयोगाकडून आरोग्य सेतू अ‍ॅपचे व्यापारीकरण, तसेच परदेशी गुंतवणूक असलेल्या कंपन्यांच्या ई-फार्मसीला प्रोत्साहन दिले जात आहे, असेही एआयओसीडीचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

करोनाचे संकट सुरू झाल्यावर, टाळेबंदीच्या काळात स्थानिक औषध विक्रेत्यांनी सर्व स्तरावर जी सेवा दिली त्याचा सन्मान करणे तर दूरच, उलट अशा प्रकारे बेकायदेशीररित्या आरोग्य सेतू अ‍ॅपचा वापर ई-फार्मसी करून देऊन केंद्र सरकार व नीती आयोग औषध विक्रेत्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करत आहे, अशी नाराजीवजा खंतही शिंदे यांनी व्यक्त केली. देशभरातील ८.५ लाख औषध विक्रेत्यांच्या भावना सध्याच्या संकटकाळात दुखावणार नाहीत, यासाठी सरकारने पावले टाकावीत, असा इशारा त्यांनी दिला आहे.