पुणेकर घरइच्छुकांकडून पसंतीची पावती मिळविणाऱ्या डीएसके डेव्हलपर्स लिमिटेडने ‘आधी घर, पैसे नंतर’ योजनेसह मुंबईत केलेल्या प्रवेशाला ग्राहकांकडून दमदार प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
कंपनीने वरळीच्या नेहरू सेंटरमधील ‘हॉल ऑफ प्रोग्रेस’ येथे योजलेल्या मुंबईतील अंधेरीसह पुण्यातील चार प्रकल्पातील घरांसाठी नोंदणीचे प्रदर्शन गुरुवारी सुरू केले आणि उद्घाटनानंतर काही मिनिटातच घर नोंदणीसाठी खरेदीदारांची झुंबड उडाली. पहिल्या दिवशीच्या प्रतिसाद चर्चेमुळे प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशीही घर नोंदणीसाठी ग्राहकांची संख्या वाढली.
याबाबत डी. एस. के. डेव्हलपर्सच्या अध्यक्षा हेमंती कुलकर्णी यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले की, आम्ही सादर केलेली योजना, योग्य किंमत व उत्कृष्ट प्रकल्प याला खरेदीदारांनी दिलेला प्रतिसाद पाहता गृहनिर्माण व्यवसायात पुन्हा हालचाल सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे. याद्वारे परडवणाऱ्या किंमतीत घरे उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
विशिष्ट रक्कम भरून घर नोंदणी करणे, महिन्याभरात ठराविक रक्कम भरणे, निश्चित रक्कम नंतरच्या टप्प्यात भरून घराचा ताबा घेणे अशा  ‘आधी घर, पैसे नंतर’ योजनेचा समावेश असलेले हे प्रदर्शन रविवार, २६ एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे.