इटालियन कंपनी बेनेलीच्या सहकार्याने डीएसके मोटोव्हील्सने सहा महागडय़ा बाइक शुक्रवारी पुण्यात सादर केल्या. प्रत्यक्षात या दुचाकी येत्या वर्षभरात बाजारात उपलब्ध होतील, अशी माहिती डीएसके मोटोव्हील्सचे अध्यक्ष शिरीष कुलकर्णी यांनी दिली. इटलीतील आघाडीची दुचाकी निर्मिती कंपनी असलेल्या बेनेलीच्या या मोटरसायकलींची डीएसके आपल्या प्रकल्पात जुळणी करणार आहे.
दुचाकी सादरप्रसंगी बेनेलीचे वरिष्ठ उपाध्यक्ष फ्रँक झाऊन्ग हेही उपस्थित होते. डीएसकेची कोरियाच्या ह्य़ोसंगनंतरची ही दुसरी विदेशी भागीदारी आहे. ३००, ६००, ८९९ व १,१३० सीसी इंजिन क्षमतेच्या पाच मोटरसायकल सादर करण्यात आल्या आहेत. सुमारे ५ हजार कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या डीएसकेचे पुणे व सातारा येथे वाहन उत्पादन प्रकल्प आहेत.
बेनेली ही इटलीतील सर्वात जुनी मोटरसायकल उत्पादन कंपनी असून सहा भावांनी मिळून तिची सुरुवात १९११ मध्ये केली. बेनेलीच्या दुचाकींसाठी येत्या सहा महिन्यांत देशभरातील २० शहरांमध्ये दालने सुरू करण्यात येणार असल्याची माहितीही या वेळी देण्यात आली.