06 July 2020

News Flash

‘डीएसके’चा कराडला दोन वर्षांत उत्पादन प्रकल्प

महागडय़ा मोटारसायकलसाठी ओळखल्या जाणाऱ्या ह्य़ोसन्गची १२५ सीसी इंजिन क्षमतेची बाइक भागीदार डीएसके मोटोव्हील्स कंपनी स्वत: तयार करणार

| December 24, 2013 08:50 am

महागडय़ा मोटारसायकलसाठी ओळखल्या जाणाऱ्या ह्य़ोसन्गची १२५ सीसी इंजिन क्षमतेची बाइक भागीदार डीएसके मोटोव्हील्स कंपनी स्वत: तयार करणार असून त्यासाठी महाराष्ट्रातील कराड येथे नवा उत्पादननिर्मिती प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. भारतीय चालकांची गरज ओळखून या बाइकमध्ये बदल करण्यात येत असून ती पूर्णत: येथेच तयार करण्यात येणार आहे. कंपनीने जीटी२५० या सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या मोटारसायकलचे तीन लाख रुपयांतील अद्ययावत मर्यादित रूपही नुकतेच सादर केले आहे. नोएडा येथे येत्या फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या वाहन प्रदर्शनात कंपनी काही नवीन दुचाकीही सादर करणार आहे.
दक्षिण कोरियाच्या ह्य़ोसन्गबरोबर दोन वर्षांपूर्वी व्यावसायिक भागीदारी करत महागडय़ा मोटारसायकल बाजारपेठेत १० टक्के हिस्सा मिळविणाऱ्या डीएसके मोटोव्हील्सने मूळ दुहेरी सिलिंडरच्या आरटी-१२५ मध्ये बदल करत ती येथे एक लाख रुपयांच्या घरात उपलब्ध करण्याचे ठरवले आहे. यासाठी नव्याने अस्तित्वात येत असलेल्या औद्योगिक महामंडळाच्या जागेत १०० एकरमध्ये यासाठी नवा प्रकल्पही उभारला जात आहे. या दुचाकीची निर्मिती येथून येत्या दोन वर्षांत करून तिची शेजारील देशांमध्ये निर्यातही करण्यात येईल, अशी माहिती डीएसके मोटोव्हील्सचे अध्यक्ष शिरीष कुलकर्णी यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.
एस अ‍ॅण्ड टी मोटर्सद्वारे ह्य़ोसन्ग हा प्रीमियम मोटारसायकल ब्रॅण्ड सर्वप्रथम गरवारे मोटर्सने भारतात आणला. त्यानंतर वर्षभरातच गरवारेने तो ८० कोटी रुपयांना डीएसकेला हस्तांतरित केला. कंपनीमार्फत सध्या ३ ते १० लाख रुपयांपर्यंतच्या (२५० ते १,००० सीसी) चार ते सहा श्रेणींतील मोटारसायकलची विक्री करते. पैकी अधिकाधिक दुचाकी या आयात करण्यात येत असून त्यासाठीचा सध्याचा वाई (सातारा) येथील प्रकल्प कराड येथे हलविण्यात येणार आहे. अकिला या कंपनीच्या सर्वात महागडय़ा दुचाकीसाठी पुरस्कार प्राप्त करणाऱ्या डीएसकेचे मार्च २०१४ पर्यंत एकूण १,५०० दुचाकी विक्रीचे उद्दिष्ट आहे.
कराडनजीकच्या नव्या प्रकल्पात एकूण ४०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येत असून केवळ १२५ सीसीच्या दुचाकीसाठीच निम्मा खर्च करण्यात येईल, असे कुलकर्णी यांनी सांगितले. २०१५ पर्यंत या बाइकची येथून निर्मिती झाल्यानंतर तिच्यासह अन्य मोटारसायकलच्या निर्यातीचे लक्ष्यही ठेवण्यात आल्याचे ते म्हणाले. कंपनीने निमशहरांमधील अस्तित्व विस्तारण्याच्या दृष्टीने मार्च २०१४ अखेर एकूण ४० विक्री दालनांचे उद्दिष्ट ठेवले असून याअंतर्गत महाराष्ट्रातील औरंगाबाद, नांदेड तसेच उत्तर-पूर्व भागात पाऊल टाकण्यात येणार आहे, असेही कुलकर्णी म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 24, 2013 8:50 am

Web Title: dsk production project two years of karad
टॅग Arthsatta,Dsk,Karad
Next Stories
1 नाराजी होती; पण धडाही घेतला..
2 ‘कोहिनूर’चा वार्षिक दीक्षान्त समारंभ
3 ग्रॅण्ड गॅलेक्सी!
Just Now!
X