16 November 2019

News Flash

‘त्याच्या हाती..’ पुरुष निर्णयक्षम!

‘डीएसपी’च्या सर्वेक्षणातील निष्कर्ष

स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांचे गुंतवणूक निर्णय घेण्याचे प्रमाण अधिक; ‘डीएसपी’च्या सर्वेक्षणातील निष्कर्ष

घर, नोकरी, व्यवसाय स्तरावर महिलांनी आघाडी घेतल्याचे चित्र असले तरी गुंतवणुकीबाबत निर्णय घेण्याचे अधिकार अद्यापही पुरुष वर्गाकडेच केंद्रीत झाल्याचे चित्र समोर आले आहे. स्रियांच्या तुलनेत पुरुषांमध्ये गुंतवणूक निर्णय घेण्याचे प्रमाण अधिक असल्याचे डीएसपी म्युच्युअल फंडाने निल्सनच्या सहकार्याने केलेल्या डीएसपी विनवेस्टर पल्स २०१९ सर्वेक्षणाच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.

या वर्षी स्रिया आणि पुरुषांच्या आर्थिक वर्तनाचा अभ्यास देशातील विविध आठ शहरांमधील ४,०१३ महिला आणि पुरुष गुंतवणूकदारांना  सहभागी करून घेत गुंतवणूक विषयक लक्ष्य आणि दृष्टिकोन समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.

या सर्वेक्षणात मुंबई, दिल्ली, कोलकाता, बेंगळुरु महानगरांसहित इंदूर, कोची, लुधियाना आणि गुवाहाटी या चार शहरांतील गुंतवणूकदारांना  सहभागी करून घेण्यात आले. सध्या नोकरी करत असलेले किंवा जे किमान २ वर्षे रोजगारकर्ते आहेत अशा एकटय़ा असणाऱ्या, मुले नसलेले विवाहित, मुले असलेले विवाहित अशा वेगवेगळ्या सामाजिक परिघातील गुंतवणूकदारांचा या सर्वेक्षणात समावेश होता.

या सर्वेक्षणातून असेही निदर्शनास आले की, केवळ ३३ टक्के स्रियांना त्यांचे गुंतवणूकविषयक निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असून पुरुषांमध्ये हे प्रमाण ६४ टक्के आहे. गुंतवणुकीबाबत स्वत:चे निर्णय घेणाऱ्या स्त्रियांना मुख्यत: पतीकडून (२२ टक्के) किंवा पालकांकडून (२४ टक्के) हे प्रोत्साहन मिळाले होते.

जोडीदाराचा वियोग झाल्याने त्यांना स्वत:च निर्णय घेणे भाग पडले, असेही निरिक्षणात नमूद आहे. केवळ ३० टक्के महिलांनी स्वत:च्या गुंतवणुकीचे निर्णय घेण्यासाठी त्यांना ते स्वत:च करायचे होते, असे कारण देण्यात आले. महिलांना गुंतवणुकीची ओळख करून देण्यात वडिलांच्या (२७ टक्के) तुलनेत पतीचा (४० टक्के) अधिक वाटा आहे. तर बाजूला ४० टक्के पुरुषांना त्यांच्या वडिलांनी याबाबतची प्राथमिक माहिती दिली होती. खालोखाल गुंतवणूकविषयक माहिती सर्वप्रथम सहकाऱ्यांकडून (३५ टक्के)  मिळाली.

या सर्वेक्षणानुसार, पुरुष आणि महिलांची प्राधान्यक्रमाची उद्दीष्टे सारखीच आहेत.  गुंतवणूक करताना, वाहन किंवा घर खरेदी करताना निर्णयप्रक्रियेत पुरुषाचा वरचश्मा असतो, असे या सर्वेक्षणात स्पष्ट झाले. तर दागिने घेणे, दैनंदिन घरगुती खरेदी वगैरेंमध्ये महिलांच्या मताला प्राधान्य असते.  गुंतवणूक सल्लागार निवडताना त्याचे तिचे शिक्षण पात्रता हा महत्त्वाचा मुद्दा असल्याचेही सर्वेक्षणातून स्पष्ट झालेआहे.

First Published on June 8, 2019 1:28 am

Web Title: dsp investment