सिद्धार्थ खांडेकर

हजाराहून अधिक ब्रँड्स, २५ ते ७५ टक्क्य़ांपर्यंत सवलती

दुबई : जगभर चर्चेचा आणि उत्सुकतेचा विषय असलेल्या दुबई शॉपिंग फेस्टिव्हलचे यंदा २५वे वर्ष असून, यानिमित्ताने आठ मैदानी खुले बाजार (आउटडोअर मार्केट्स) नव्याने खुल्या करण्यात आल्या आहेत. मोठमोठाल्या मॉल्सप्रमाणेच या बाजारपेठाही खरेदीदारांसाठी पर्वणी ठरत असून, १ फेब्रुवारी रोजी फेस्टिव्हल संपण्याआधी त्यांचा लाभ जगभरचे खरेदीदार घेतील अशी आशा संयोजकांना वाटते.

सरलेल्या २६ डिसेंबरपासून सुरू झालेल्या दुबई शॉपिंग फेस्टिव्हलमध्ये (डीएसएफ) जवळपास एक हजारांहून अधिक ब्रँड्स असलेली जवळपास ४००० दुकाने आणि कक्ष कार्यरत आहेत. अनेक बाजारपेठा आणि मॉल्समध्ये ७५ टक्क्य़ांपर्यंत घसघशीत सवलत दिली जात आहे. ‘१९९६मध्ये सुरू झालेल्या डीएसएफमध्ये दरवर्षी दुबईचे काही तरी वैशिष्टय़ अधोरेखित करण्याचा आमचा प्रयत्न असतो. यंदा २५वे वर्ष असल्यामुळे या संपूर्ण काळात दुबई कशी विकसित झाली, हे दाखवण्याचा आमचा प्रयत्न आहे. डीएसएफमध्ये दरवर्षी ग्राहक मोठय़ा प्रमाणात बक्षिसे जिंकतात. यंदाचे वर्ष अशा ग्राहकांसाठी पर्वणी ठरेल,’ असे दुबई फेस्टिव्हल अ‍ॅण्ड रिटेल एस्टॅब्लिशमेंटचे (डीएफआरई) मुख्य कार्यकारी अधिकारी अहमद अल खाजा यांनी सांगितले. दुबईमध्ये वारंवार येणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. कारण संपूर्ण कुटुंबासाठीच हा आनंददायी अनुभव असतो, असे अल खाजा यांनी नमूद केले.

बाजारहाटाच्या बहुतेक सर्व ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच खास मुलांसाठीच्या खेळांचीही रेलचेल आहे. तशात सध्या दुबईतील हवा आल्हाददायक आहे. त्यामुळे खरेदीसाठी दुबईत जाणे हा खरोखर आनंददायी अनुभव ठरत आहे. अल सीफच्या सान्निध्यात वसलेले सुवर्णबाजार आणि मसालेबाजारदेखील आवर्जून भेट द्यावे असे आहेत.

माजिद अल फुत्ताइम मॉल, सिटी सेंटर मिडरिफ, मॉल ऑफ एमिरेट्स, सिटी सेंटर डीरा, माय सिटी सेंटर बार्शा येथे १२ तासांचे सेल सुरू आहेत. २५ ते ७५ टक्क्य़ांपर्यंत सवलती या ठिकाणी मिळू शकतात. ‘मार्केट आउटसाइड द बॉक्स’ उपक्रमाअंतर्गत खरेदीच्या ठिकाणी स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय गायक, वादक, संगीतकारांचे कार्यक्रम, फूडस्टॉल, मुलांसाठी गेमझोन्स सुरू करण्यात आले आहेत. प्रचंड सवलतीची गिफ्ट व्हाउचर, आलिशान मोटारीची हमी देणारी रॅफल (लॉटरी) ही डीएसएफची आणखी काही वैशिष्टय़े. इतक्या मोठय़ा प्रमाणात पर्यटक आल्यानंतर त्यांना आवडतील असे सर्व तऱ्हेचे खाद्यपदार्थ उपलब्ध करून देणारी शेकडो रेस्तराँ ला मेर, अल खवानीज या ठिकाणी उभी राहिली आहेत. ग्लोबल व्हिलेज या भागात भारतासह जवळपास ५० देशांनी त्यांच्या पारंपरिक वस्तू विकण्यासाठी उंची पॅव्हेलियन्स उभी केली आहेत. तेथे जाऊन विविध वस्तू खरेदी क रणे हादेखील एक वेगळा अनुभव ठरतो. दुबई मॉलमध्ये जगातील सर्वात मोठे मत्स्यालय पर्यटकांचे आणि विशेषत: लहानग्यांचे आकर्षण ठरत आहे. दुबई मॉलमध्येही घडय़ाळांपासून, इलेक्ट्रॉनिक वस्तू, कपडे, अत्तरे, चॉकलेट्स यांच्यावर भरपूर सवलत दिली जात आहे.

दुबईतील बाजारपेठा या जिवंत आणि रसरशीत वाटतील याची पुरेपूर काळजी डीएसएफच्या संयोजकांनी घेतलेली आहे. नवीन काही खरेदी करतानाच, नवीन काही तरी अनुभवायला आणि शिकायला मिळते असे या फेस्टिव्हलविषयी ठामपणे म्हणता येते.

खुला बाजार – खरेदीदारांचे आकर्षण

आधुनिक शॉपिंगच्या झगमगाटात पारंपरिक पेठांचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या लास्ट एग्झिट अल खवानीज, अल रिगा स्ट्रीट, अल सीफ, सिटी वॉक, अल शिंदाघा, हाटा, दुबई फेस्टिव्हल सिटी, बुर्ज पार्क, डाऊनटाऊन दुबई अशा अनेक पेठा ग्राहकांना आकर्षित करत आहेत. मोठमोठाल्या मॉल्सप्रमाणेच हे मैदानी व रस्त्यावरील खुले बाजारही खरेदीदारांसाठी पर्वणी ठरत आहे.