अमेरिकेतून आयात केल्या जाणाऱ्या जवळपास 106 उत्पादनांवर चीनने 25 टक्के आयात शुल्क अतिरिक्त जाहीर केल्याने जागतिक बाजारात तीव्र पडसाद उमटले आहेत. चीनच्या या कृतीमुळे ट्रेड वॉरची परिस्थिती निर्माण होऊ शकते अशी भीती गुंतवणूकदारांमध्ये उत्पन्न झाली आहे. याचे प्रतिबिंब भारतीय शेअर बाजारात उमटलेले बुधवारी बघायला मिळाले. अमेरिकेने चिनी उत्पादनांच्या आयातीवर 50 अब्ज डॉलर्सचा कर लादण्याचा प्रस्ताव जाहीर केल्यावर काही तासांमध्येच चीननं हा निर्णय घेतल्याने आता ट्रेड वॉर होईल अशी भीती व्यक्त होत आहे.

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स व राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हे दोन्ही निर्देशांक जवळपास एक टक्क्याने घसरले आहेत. सेन्सेक्स मंगळवारच्या तुलनेत बुधवारी 351.56 अंकांनी घसरून 33,019.07 वर स्थिरावला. तर निफ्टी 116.60 अंकांनी घसरून 10,128.40 वर स्थिरावला. नव्या आर्थिक वर्षाची सुरूवात खरंतर चांगली झाली होती. या महिन्याच्या पहिल्या दोन दिवसांमध्ये सेन्सेक्स 300 अंकांनी वधारला आणि वातावरण उत्साहाचे दिसले होते. बुधवारी सकाळीही बाजारात निराशेचे वातावरण नव्हते, उलट सेन्सेक्स 135 अंकांनी वधारलेला होता. मात्र, चीनने आपला निर्णय दुपारच्या सुमारास जाहीर केला आणि ठराविक कंपन्यांचा अपलाद वगळता बहुतेक सगळ्या शेअर्सच्या विक्रीचा मारा झाला. बाजारातील घबराटीमुळे झालेल्या या विक्रीमुळे दोन्ही निर्देशांक कोसळले आहेत.

टाटा स्टील, वेदांता लिमिटेड, येस बँक, लार्सन अँड टूब्रो या शेअर्सच्या किमतीत मोठ्या प्रमाणावर घसरण झाली आहे. विशेष म्हणजे टाटा मोटर्सचा शेअर 3.50 टक्क्यांनी वधारला. या खेरीज हिंदुस्तान युनीलिवर, अदाणी पोर्ट व हीरो मोटरकॉर्पच्या शेअर्सच्या भावातही वाढ बघायला मिळाली.