बी टू बी धाटणीच्या मंचासाठी ‘क्लाउडबाय’शी सामंजस्य
देशातील उद्योगजगताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या भारतीय उद्योग महासंघ अर्थात ‘सीआयआयला’ही नव्या जमान्याच्या ऑनलाइन बाजारमंचाने भुरळ घातली असून, तिनेही आपल्या सदस्यांचा उलाढाल खर्च लक्षणीय कमी करणाऱ्या आणि त्यांना जागतिक स्तरावर निर्यातीच्या संधी उपलब्ध करणाऱ्या ई-बाजारमंचासाठी पुढाकार घेतला आहे.
क्लाऊड तंत्रज्ञानावर आधारीत ई-कॉमर्स मंचासाठी उपाययोजना पुरविणाऱ्या ब्रिटनस्थित ‘क्लाउडबाय’ या कंपनीवर ही जबाबदारी सोपविण्यात आली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अलिकडच्या ब्रिटन दौऱ्यादरम्यान पुढे आलेल्या या कल्पनेने अल्पावधीतच मूळ धरले आहे.
उभय देशातील उद्योजकांनी व्यक्त केलेल्या ब्रिटिश-भारतीय व्यापार भागीदारीच्या मजबुतीची गरज फलद्रुप व्हायची तर देवाणघेवाणीचे सामाईक व्यासपीठ हे ऑनलाइन धाटणीचेच असावे, असे पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत लंडनमध्ये झालेल्या उद्योजकांच्या बैठकीत निश्चित झाले.
पुढे रीतसर करार-मदार होऊन क्लाऊडबायने काम हाती घेतले आणि येत्या एप्रिलपर्यंत हे ऑनलाइन व्यासपीठ आकारालाही येईल, असे क्लाउडबायचे भारतातील प्रभारी निलेश गोपाली यांनी सांगितले. या व्यापार ते व्यापार (बी टू बी) धाटणीच्या नव्या व्यासपीठातून पुढील पाच वर्षांत ३.५ अब्ज पौंड (साधारण ३५,२६६ कोटी रु.) व्यापारी उलाढाल अपेक्षिण्यात येत आहे.
सीआयआयकडून प्रवर्तित http://www.CIITrade.in या नव्या ई-व्यासपीठातून मात्र त्यांच्या मर्यादित वर्तुळातील व्यापाराला प्रदेश व देशाच्या सीमांचे बंधन सहजी ओलांडता येईल आणि अधिक गतिमान सेवा, अल्पतम उलाढाल खर्चात प्रदान करता येईल, असा विश्वास सीआयआयचे महासंचालक चंद्रजीत बॅनर्जी यांनी व्यक्त केला. पहिल्या टप्प्यांत सीआयआयच्या विद्यमान ८,००० उद्योजक सदस्यांमधून नव्या ई-व्यासपीठात सहभाग मिळविला जाईल, असे क्लाउडबायचे नीलेश गोपाली यांनी सांगितले. छोटय़ा उद्योजकांना तंत्रज्ञानात्मक पाठबळ, प्रशिक्षण, पायाभूत सुविधा पुरविण्याची तयारी क्लाउडबायने देऊ केली आहे. कच्चा माल, तयार वस्तू, आयात-निर्यातदार सर्वाची एकत्र मोट बांधत त्यांच्यातील उलाढालींना सुलभता देणाऱ्या या व्यासपीठाला उमदा प्रतिसाद मिळेल, अशी त्यांनाही आशा आहे.
भारतात साडेचार कोटी उमदी उद्यमशीलता असलेले सूक्ष्म, लघू व मध्यम (एसएमई) उद्योग कार्यरत आहेत. यापैकी २० ते ३० लाख नोंदणीकृत व त्यातही जेमतेम काही टक्के मंडळींच्या व्यवसायाला नव्या जमान्याच्या इलेक्ट्रॉनिक माध्यमाचे कवच लाभले आहे.