अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी चालू वर्षांत अर्थसंकल्पीय भाषणात घालून दिलेल्या लक्ष्याप्रमाणे, २०१४ पर्यंत १० हजारांहून अधिक लोकसंख्या असलेल्या देशातील प्रत्येक नगरात शाखा कार्यालय स्थापण्याच्या प्रयत्नाचा भाग सार्वजनिक क्षेत्रातील भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी)च्या ३०० छोटय़ा कार्यालयांचे मंगळवारी उद्घाटन करण्यात आले. अर्थमंत्री चिदम्बरम यांनी नवी दिल्लीत त्यांच्या कार्यालयात बसून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारेएकाच वेळी या सर्व कार्यालयांचे ई-उद्घाटन केले. यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय अर्थराज्यमंत्री नमो नारायण मीना आणि अर्थमंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. एलआयसीचे हंगामी अध्यक्ष थॉमस मॅथ्यू टी. यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, या आधीच देशाच्या विविध भागात लोकांकडून विमा हप्ते गोळा करणारी आणि अन्य प्राथमिक सेवा देणारी अशा धर्तीची ३४६ छोटी शाखा कार्यालये सुरू करण्यात आली आहेत. येत्या डिसेंबपर्यंत १० हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या सर्व नगरे व गावांमध्ये एलआयसीचे कार्यालय थाटण्याचे उद्दिष्ट गाठले जाण्याबाबत त्यांनी विश्वास व्यक्त केला.