स्पर्धा म्हणून पाच पैसे, एक पैसा अशी दलाली शुल्कातील चढाओढ संपुष्टात आली असतानाच शेअर्सच्या  खरेदी-विक्रीवर तुम्हाला लाभ झाला तरच दलाली शुल्क देण्याची शक्कल पुढे आली आहे.
‘वेल्थ रेज’ ही देशातील आघाडीची दलाल पेढी व विश्लेषक कंपनी आहे. २०१० पासून दलाल पेढी म्हणून व्यवसाय सुरू करणाऱ्या या कंपनीने नुकतीच विश्लेषक म्हणूनही सेवा सुरू केली आहे. कंपनीच्या ताफ्यात सध्या ५०० हून ग्राहक आहेत.
अद्ययावत करता येणारे प्री-पेड स्वरूपातील व्हॉऊचर कंपनी आपल्या ग्राहकांना देणार आहे. ती १,०००, २,०००, ५,००० व १०,००० रुपये किमतीची असतील. यावर ग्राहकांना प्रत्येक दिवशी प्रत्येक क्षेत्रातील तीन शिफारशी मिळतील. एसएमएस पद्धतीने त्या पाठविल्या जातील. डेरिव्हेटिव्ह, कमॉडिटी, चलन या क्षेत्रातील त्या असतील. या शिफारशींनुसार ग्राहकाने व्यवहार केला व त्याला लाभ झाला तरच ब्रोकरेज शुल्क आकारले जाईल. हे शुल्क ५० ते १०० रुपयांदरम्यान असेल.
नव्या व्यवसाय योजनेमुळे कंपनी एक हजार ग्राहक जोडेल, असा विश्वास यानिमित्ताने कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरण कुमार कविकोंडला यांनी व्यक्त करण्यात आला आहे. शिफारशीतील कंपनीच्या नेमकेपणाचे प्रमाण हे तब्बल ७५ टक्के असल्याचा दावाही त्यांनी या वेळी केला.