करोना साथ आणि लागू टाळेबंदीमुळे विमाधारकांच्या किंवा वारसांच्या योजनेच्या प्रक्रियेदरम्यानच्या मर्यादा लक्षात घेऊन भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात ‘एलआयसी’ने तिच्या विमाधारकांना त्यांचे दावे आणि संबंधित कागदपत्रे नजीकच्या शाखेत येथे जमा करण्यास अनुमती दिली आहे.

करोना आजार साथीच्या प्रसारामुळे विमाधारकांच्या वारसांना किंवा मुदतपूर्तीनंतर विमाधारकांना दावा सदर करण्यास अडचणी येत होत्या. परिणामी एलआयसीने तिच्या विमाधारकांना मुदतपूर्तीनंतर करावे लागणाऱ्या प्रक्रियेत सुधारणा केल्या असून ग्राहकांच्या अडचणी दूर करण्यासाठी ग्राहककेंद्रित उपक्रमात मोठे बदल केले आहेत.

‘एलआयसी’च्या ११३ विभागीय कार्यालये, २,०४८ शाखा आणि १,५२६ विस्तारित कार्यालये आणि ७४ ग्राहकसेवा कार्यालयात विमाधारकांची कागदपत्रे आणि दावे स्वीकारले जातील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. एलआयसीच्या कोणत्याही कार्यालयात जाऊन संबंधित अधिकाऱ्याकडे दावे सदर करू शकतील, असेही नमूद करण्यात आले आहे. हा बदल तात्पुरता असून तात्काळ प्रभावाने ३१ मार्च २०२१ पर्यंत सुरू असेल, असे सांगण्यात आले.