करोनामुळे प्रवास आणि संचारावर निर्बंध आल्यामुळे जीवन विमाविषयक दावे सादर करण्यात होणारा विलंब टाळण्यासाठी भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसीने तिच्या संकेतस्थळावर ऑनलाइन दावे दाखल करण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे.

पॉलिसीच्या मुदतपूर्तीचे दावे किंवा मृत्यूदावे, पॉलिसीचे पुनरुज्जीवन, जीविताचे प्रमाणन, वर्षांसन योजना आदी प्रक्रिया एलआयसीच्या विमाधारकांना प्रत्यक्ष शाखेत जावे न लागता ऑनलाइन पद्धतीने पार पाडता येतील.

टाळेबंदी लागू झाल्यावर एलआयसीने दावे सादर करण्यासाठी प्रत्येक शाखेत एक विशेष ई-मेल आयडी तयार करून दावे सादर करण्यास विमाधारकांना कळविले होते. परंतु ही सुविधा ३० जूनपर्यंत उपलब्ध होती. आता दावा सादर करण्यास दावेदारास संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे. अशा विमा दाव्यांच्या समर्थनार्थ सादर करायचे दस्तऐवज विमा विक्रेता किंवा एलआयसीच्या शाखेत जमा करायचे नसून, या कागदपत्रांची छायाचित्रे दाव्यासोबत ऑनलाइन अपलोड करायचे आहेत.

वर्ष २०१६ पासून सुरू झालेल्या या सेवेसाठी आजवर ३.४ लाख विमाधारकांनी या आधीच नोंदणी केली असून, २०१९ अखेपर्यंत ऑनलाइन सेवेवर ९.११ लाख पॉलिसींची नोंदणी झाली असल्याची माहिती एलआयसीच्या वार्षिक अहवालात देण्यात आली आहे.

‘एलआयसी’कडे ऑनलाइन दावे सादर करण्याचे टप्पे

*  महामंडळाचे संकेतस्थळ – http://www.licindia.in वर लॉग-इन करावे

* ऑनलाइन सेवा विकल्प निवडावा

*  पॉलिसीच्या मुदतपूर्तीचा दावा असल्यास विमाधारकाने किंवा मृत्यूचा दावा असल्यास वारसाने लॉगइन आयडी आणि पासवर्ड तयार करावा.

*   दाव्याचा योग्य पर्याय निवडा

*   फॉर्ममध्ये आवश्यक तपशील आणि समर्थनार्थ दस्तऐवज अपलोड करा