ई-पेठांमध्ये पाय विस्तारण्याची व्यूहरचना

मुंबई : ई-व्यापारातील जागतिक अग्रणी ‘ईबे’ने भारतातील ई-पेठांमध्ये गेल्या काही वर्षांत झालेली पिछाडी भरून काढण्याच्या व्यूहरचनेचा भाग म्हणून आणि या बाजारपेठेत पुन्हा आपले पाय जमविताना, पेटीएम मॉल या नवागत ई-व्यापार बाजारमंचाची साथ मिळविण्याचे ठरविले आहे. ईबेने या बाजारमंचातील ५.५ टक्के भागभांडवलाची मालकी मिळविली असून, त्यायोगे भारतातील पेटीएम मॉलच्या लाखो सक्रिय ग्राहकांना ईबेची उत्पादन मालिका उपलब्ध केली जाणार आहे.

ईबेकडून केल्या गेलेल्या या व्यवहारांतून, अ‍ॅमेझॉन डॉट कॉम आणि वॉलमार्टच्या मालकीच्या फ्लिफकार्ट व स्नॅपडीलचा वरचष्मा असलेल्या ई-पेठेत स्पर्धेला आणखी धार दिली जाणार आहे.

उभय कंपन्यांमधील नवीन संबंध ईबे विक्रेत्यांना वेगाने वाढत्या ई-पेठेत नवीन ग्राहकांपर्यंत पोहचण्याची संधी प्रदान करेल, तसेच पेटीएम मॉलच्या ग्राहकांना जागतिक वस्तू व उत्पादनांमधून निवडीची विस्तृत संधी मिळेल. आगामी आठवडय़ापासून जगभरातील ईबे विक्रेत्यांकडून उत्पादित लाखो उत्पादने पेटीएम मॉलवर विक्रीसाठी दिसू लागतील.

उभय कंपन्यांमध्ये ताज्या व्यवहाराचे आर्थिक गणित स्पष्ट करण्यात आले नसले तरी, प्रत्यक्ष माहीतगार सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईबेकडून पावणेदोन कोटी डॉलर (सुमारे ११४ कोटी रुपयांची) पेटीएम मॉलमध्ये गुंतवणूक केली गेली आहे.

ईबे एपीएसीचे वरिष्ठ उपाध्यक्ष जूमन पार्क यांनी स्पष्ट केले की, भारतासारख्या गतिशील बाजारपेठेत वाढीच्या लक्षणीय संधी दिसून येतात. पेटीएम मॉलशी जुळलेल्या संबंधांकडे बाजारपेठेच्या सर्व शक्यतांना आजमावण्याची संधी म्हणून ईबे पाहात असल्याचे त्यांनी सांगितले.