वर्ष मावळतीला व महिन्यातील वायदापूर्तीला एक दिवस शिल्लक असताना भांडवली बाजारात नफेखोरीचे धोरण अवलंबिताना गुंतवणूकदारांनी बुधवारी दोन्ही निर्देशांकांना त्यांच्या अनोख्या टप्प्यापासून खाली आणले.

परिणामी ११९.४५ अंश घसरणीसह सेन्सेक्स २५,९६०.०३ वर तर ३२.७० अंश घसरणीने निफ्टी ७,८९६.२५ पर्यंत घसरला. यामुळे प्रमुख निर्देशांक त्यांच्या महिन्याभरातील स्तरावरूनही ढळले.

ख्रिसमसनिमित्त सुटी असल्याने भांडवली बाजारातील महिन्याच्या वायदापूर्तीची अखेर या गुरुवारी, ३१ डिसेंबर रोजी होऊ घातली आहे. २०१५ चा बाजारातील व्यवहाराचाही हा अखेरचा दिवस आहे. या पाश्र्वभूमीवर मंगळवापर्यंत अधिकच्या मूल्यावर असलेल्या समभागांच्या विक्रीचा सपाटा गुंतवणूकदारांनी बुधवारी लावला.

अमेरिकेच्या फेडरल रिझव्‍‌र्हची व्याजदर वाढ व चीनमधील आर्थिक मंदी यांचा उल्लेख करत जागतिक स्तरावर अस्वस्थतेच्या जोखिमेत भर पडण्याची शंका आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अध्यक्षांनी व्यक्त केल्यानंतर येथील बाजारात अधिक चिंता निर्माण झाली. यामुळे सत्रअखेर सेन्सेक्सने २६ हजार तर निफ्टी ७,८०० चा स्तर सोडला.

गेल्या दोन व्यवहारांत मुंबई निर्देशांकाने २४०.७७ अंश भर नोंदविली होती. बुधवारी सेन्सेक्समधील २१ समभागांचे मूल्य घसरले. यामध्ये मारुती सुझुकी, स्टेट बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, हीरो मोटोकॉर्प, अदानी पोर्ट्स, आयसीआयसीआय बँक, बजाज ऑटो, लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो हे घसरणीत आघाडीवर राहिले.

मद्य उत्पादक कंपन्यांचे समभागही व्यवहारात मोठय़ा प्रमाणात घसरले. १.२१ टक्के घसरणीने माहिती तंत्रज्ञान निर्देशांकात इन्फोसिस, विप्रो, टीसीएस यांचे मूल्य रोडावले. सोबतच तेल व वायू, बँक, सार्वजनिक उपक्रम, वाहन, स्थावर मालमत्ता निर्देशांकही घसरले.