पावसामुळे बाजाराला फटका; सोने, घर आणि वाहनविक्री उद्योगातील निराशा कायम

व्यापार प्रतिनिधी, मुंबई</strong>

एकूणच देशाच्या आर्थिक मंदीच्या चित्रात रंगलेल्या सराफा क्षेत्राचा ऐन दिवाळीचा पहिला दिवस काहीसा नीरस गेला. पावसाळी वातावरण असलेल्या आर्थिक राजधानीत सोने खरेदीबाबत ग्राहकांमध्ये निरुत्साह होता.

महागाई स्थिरावत असताना आणि विकास दराला वेग नसताना स्वस्त व्याजदराच्या कर्जाच्या माध्यमातून रिझव्‍‌र्ह बँकेने यापूर्वीच खरेदीपूरक वातावरण तयार केले. मात्र रोजगार आदी कारणानिमित्ताने वाहन व घर खरेदीदारांकडून कर्ज मागणी वाढली नाही.

अशाच वातावरणात यंदाचा दसरा पार पडला. मात्र ऐन दिवाळीच्या तोंडावर आकस्मिक अशा पावसाने खरेदीदारांच्या उत्साहावर पाणी फेरले आहे.  मुंबईत तोळ्याला ३९ हजाराच्या आतील दर असूनही सोने मागणी यंदा घसरली आहे. तर चांदीचा किलोचा भाव ४६,५०० रुपयांपुढे आहे. ‘कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’च्या अंदाजानुसार, शुक्रवारच्या धनत्रयोदशीला २,५०० कोटी रुपयांचे व्यवहार नोंदले जात आहेत. मात्र हे प्रमाण गेल्या वर्षीच्या धनत्रयोदशीतील ५,५०० कोटी रुपयांच्या तुलनेत यंदा निम्म्यापेक्षा कमी आहे. धनत्रयोदशीसारख्या सणाच्या निमित्ताने तिसऱ्या तिमाहीत एकूण विक्रीपैकी ३० टक्के विक्री होते, असे ‘आयबीजेए’च्या संचालक तान्या रस्तोगी यांनी सांगितले. खरेदीदार वर्षभर दागिन्यांना पसंती देतात; मात्र दिवाळीत मौल्यवान धातूला गुंतवणूक म्हणून पाहिले जाणारा कल असल्याचे निरीक्षण वामन हरी पेठेचे संचालक आदित्य पेठे यांनी नोंदविले.

गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदाच्या धनत्रयोदशीला २५ टक्क्यांपर्यंतची वाढ अपेक्षित असल्याचे अनमोल ज्वेलर्सच्या इशु दातवानी यांनी सांगितले. ग्राहकांकडून होणाऱ्या खरेदीबाबत आम्हाला यंदा ५ टक्के अधिक प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे, असे ऐशप्रा जेम्स अँड ज्वेल्सचे संचालक वैभव सराफ यांनी सांगितले.

पावसाचा तडाखा :

ऑक्टोबर संपत आल्यानंतरही पाऊस रेंगाळल्यामुळे बाजारातील खरेदी-विक्रीवर परिणाम होत आहे. कंदील, रांगोळी, कपडे, सजावटीचे सामानाच्या विक्रीने फुललेल्या दिवाळीच्या बाजाराच्या शिरस्त्याला यंदा पाऊस उपद्रव ठरत आहे. राज्यातील बहुतांश शहरगावांमध्ये  पाऊ स आणि सर्वत्र साचलेल्या चिखलामुळे दिवाळीसाठी लागणारे रांगोळी, दिवे, उटणे, कंदील, फु ले, पूजेचे साहित्य विकणाऱ्या दुकानदारांना पावसामुळे फटका बसला आहे. लोकांच्या खरेदी उत्साहात संध्याकाळी येणाऱ्या वादळी पावसामुळे  विघ्न येत आहे.

मुहूर्ताची सोनेखरेदी रोडावली..

सोन्याचे दर तुलनेत कमी असूनही मुहूर्ताची खरेदीही यंदा रोडावली आहे. दागिने आदी खरेदी करण्याऐवजी नाणी, बार तसेच वळे आदी मौल्यवान धातू प्रकाराला मुहूर्ताची खरेदी व गुंतवणूक म्हणून पसंती दिली जात असली त्याचे प्रमाण वाार्षिक तुलनेत कमी असल्याचे सराफा व्यवसायिकांचे म्हणणे आहे.

फुलांवरही संकट

पुणे : दिवाळीत फुलांना मोठी मागणी असते. त्यामुळे नेहमीच्या तुलनेत जादा दर मिळतील, या आशेने फुलांची लागवड केलेले शेतकरी संततधार पावसामुळे अक्षरश: रडकुंडीला आले आहेत. सध्या बाजारात ओली फुले विक्रीस पाठवली जात असून फुलांना अपेक्षेएवढे दर मिळत नाहीत.  दसऱ्यापासून सुरू झालेल्या पावसाने उघडीप घेतली नाही. त्यामुळे फु लांच्या प्रतवारीवर परिणाम झाला आहे. काही शेतकरी फुलांची तोडणी करून फुले सुकवित आहेत. त्यामुळे कोरडय़ा फुलांना सध्या चांगले दर मिळत आहेत. मुंबई उपनगरांसह पुण्यातही झेंडू, शेवती, अष्टर, गुलछडी फुलांची विक्री मंदावली आहे.