कोविड-१९ साथीच्या प्रारंभिक आघातातून भारतीय अर्थव्यवस्था अपेक्षेपेक्षा अधिक मजबूतपणे सावरताना दिसत असल्याचे रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी प्रतिपादन केले. सणोत्सवाच्या काळात दिसलेली मागणीतील वाढ पुढेही टिकून राहील, यावर मात्र लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

आगामी काळात जगभरात आणि भारताच्याही आर्थिक विकासाला नकारात्मक धोके आहेत, अशी पुस्तीही दास यांनी फॉरीन एक्स्चेंज डिलर्स असोसिएशन ऑफ इंडिया (फेडाई) या विदेशी चलन व्यापाऱ्यांच्या वार्षिक दिन कार्यक्रमात बोलताना जोडली.

भारताची अर्थव्यवस्था ही चालू आर्थिक वर्षांच्या एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत २३.९ टक्क्य़ांनी आकुंचन पावली आहे. रिझव्‍‌र्ह बँकेने संपूर्ण आर्थिक वर्षांत विकासदर उणे ९.५ टक्के असा नकारात्मक राहण्याचे अंदाज वर्तविला आहे. मात्र टाळेबंदीतील शिथिलतेनंतर, अर्थचक्र खुले झाल्यावर मुख्यत: सणासुदीच्या दिवसांमध्ये अर्थव्यवस्थेत गतिमान उभारी दिसून आली आहे आणि ती जशी अपेक्षा केली जात होती त्यापेक्षा सरस आहे, असे दास यांनी सांगितले.

अर्थवृद्धीच्या दृष्टिकोनातून सुधारणा झाली असली तरी युरोपातील काही राष्ट्रे आणि भारतातही काही भागात साथीचा पुन्हा भडका पाहता, येत्या काळात विकासाला असलेला नकारात्मक जोखमीचा पदर अजूनही पुरता दूर सरलेला नाही, असा इशाराही दास यांनी दिला. मागणीतील वाढ ही सणांनंतर टिकून राहते काय आणि लशीबाबत आशावादातून दिसलेल्या बाजारपेठेतील उत्साहाचे फेरमूल्यांकन करून सतत जागरूक राहायला हवे, असेही त्यांनी सांगितले.