कृषी उत्पादन आणि सेवा क्षेत्रात क्रियाकलाप पूर्वपदावर येत असल्याचे सुस्पष्टपणे दिसून येत असून, केंद्र सरकार तसेच रिझव्‍‌र्ह बँकेने तातडीने हाती घेतलेल्या धोरणात्मक उपायांनी अर्थव्यवस्थेचे अल्पतम नुकसानीसह पुनरुज्जीवन करणे शक्य बनणार आहे, असा दावा मंगळवारी अर्थमंत्रालयाने केला.

भारताच्या अर्थव्यवस्थेचा शेती मुख्य पाया असल्याची कबुली देत, जसे अंदाजले जात आहे त्याप्रमाणे सामान्य पर्जन्यमान राहिल्यास ते अर्थव्यवस्थेच्या फेरउभारीला चालना देणारे ठरेल, असा अर्थमंत्रालयाचा आशावाद आहे. जरी उद्योग व सेवाक्षेत्राच्या तुलनेत सकल राष्ट्रीय उत्पादनात शेतीक्षेत्राचे योगदान खूप मोठे नसले तरी शेतीवर अवलंबून असलेला लोकसंख्येचा मोठा घटक पाहाता त्यातील वाढ ही फायद्याचीच ठरेल, अशी पुस्तीही त्यांनी जोडली आहे.

शेतीव्यतिरिक्त सरलेल्या मे व जून महिन्यांत वीज आणि इंधनाच्या वापरात वाढ, राज्यांतर्गत तसेच आंतरराज्य वाढलेली मालवाहतूक, किरकोळ वित्तीय उलाढाली आदी अर्थचक्राच्या पुनरुज्जीवनाच्या दिशेने सुखावणाऱ्या गोष्टी असल्याचे अर्थमंत्रालय सांगते.