जपानी दुचाकी निर्मात्या होंडाच्या मुख्याधिकाऱ्यांचे ठाम प्रतिपादन

नवी दिल्ली : विद्यमान अर्थव्यवस्थेतील मंदावलेपण हेच दुचाकींच्या विक्रीतील लक्षणीय घसरणीचे मुख्य कारण आहे, असे होंडा मोटर सायकल्स अँड स्कूटर्स इंडिया या दुचाकी निर्मिती कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ठाम प्रतिपादन करीत, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या ‘विक्रीत घट ओला-उबरमुळे’ या सारवासारवीवर शरसंधान साधले आहे.

पुढील वर्षांपासून बीएस-६ मानकांकडे संक्रमणातून किमती आणखी वाढणार असून, त्यातून मंदावलेल्या विक्रीच्या समस्येशी झुंजत असलेल्या वाहन निर्मात्यांपुढे मोठी आव्हानाची परिस्थिती निर्माण होईल, असे होंडा मोटरसायकल्स अध्यक्ष व मुख्याधिकारी मिनोरू काटो यांनी बुधवारी येथे सांगितले. सरलेल्या ऑगस्ट महिन्यात स्कूटर आणि मोटारसायकल्स अशा एकूण दुचाकींच्या विक्रीत २२.२४ टक्के अशी मोठी घसरण दिसून आली आहे. घसरणीचा हा सलग दहावा महिना आहे.

सप्टेंबर २०१८ पासून वाहन विमा हप्त्याच्या रकमेत झालेली वाढ, वस्तू व सेवा कराचे (जीएसटी) दर कमी केले जाण्याची अपेक्षा तसेच जुन्या बीएस-४ वाहनांची सवलत किमतीत विक्री केली जाईल यासाठी खरेदी निर्णयासंबंधी ग्राहकांनी घेतलेले वाट पाहण्याचे धोरण हे घटकही एकंदर विक्रीत घसरणीला कारणीभूत आहे, असे काटो यांनी नवीन बीएस-६ मानकांना अनुकूल अ‍ॅक्टिव्हा १२५ स्कूटरच्या अनावरणप्रसंगी बोलताना सांगितले.

विमा हप्त्याचा भार वाढला तरी तो एकंदरीत फायद्याचाच असल्याचे ग्राहकांच्या लक्षात आले आणि विक्री पुन्हा वाढत असल्याचे मध्यंतरी दिसून आले. तरी जीएसटी कपातीची धूसर बनत गेलेल्या शक्यतेने ग्राहकांची निराशा आणि एकूण अर्थव्यवस्थेचा पाया डळमळीत झाल्याचे दर्शविणारी मंदीची चुणूक यातून वाहनांच्या मागणीलाही ग्रहण लागले, अशी काटो यांनी कारणमीमांसा केली. ज्याचा अर्थमंत्री सीतारामन यांनी मंगळवारी चेन्नई येथे बोलताना प्रतिवाद करताना, मंदीसाठी नवतरुण पिढीची प्रवासासाठी ओला-उबरसारख्या पर्यायांकडे कललेली मानसिकता जबाबदार असल्याचे प्रतिपादन केले होते.

अर्थव्यवस्थेतील मंदावलेपण हाच वाहन विक्रीवर परिणाम करणारा सर्वात मोठा घटक आहे, असे काटो यांनी पत्रकारांकडून विचारण्यात आलेल्या प्रश्नावर सुस्पष्टपण उत्तर दिले. पुढील वर्ष तर विक्रीच्या दृष्टीने आणखी आव्हानात्मक असेल, असे त्यांनी ‘बीएस-६’ मानकांचे पालन करताना करावे लागणारे यांत्रिक फेरबदल व परिणामी वाढणाऱ्या किमती लक्षात घेऊन केले. नवीन होंडा अ‍ॅक्टिव्हा आधीच्या ‘बीएस-४’ समर्थ मॉडेलच्या तुलनेत १४ टक्के महाग म्हणजे ६७,४९० (एक्स-शोरूम) किमतीत बाजारात आली आहे. कंपनीने या नव्या संक्रमणासाठी आपल्या निर्मिती प्रकल्पांमध्ये २४०० कोटींची गुंतवणूक केली आहे.

वाहन समभाग तेजीच्या प्रवासावर

मुंबई : आर्थिक मंदीच्या चक्रात अडकलेल्या वाहन क्षेत्रावरील वस्तू व सेवा कराचा भार कमी करण्याच्या सरकारच्या संकेताने वाहन क्षेत्रातील कंपन्यांचे समभाग मूल्य बुधवारी मुंबई शेअर बाजारात उंचावले. टाटा मोटर्स, मारुती सुझुकी, बजाज ऑटो, हीरो मोटोकॉर्प, महिंद्र अँड महिंद्र आदींच्या समभाग मूल्यामध्ये १० टक्क्यांपर्यंत वाढ नोंदली गेली.

जीएसटी कपात; अर्थमंर्त्यांकडेच निर्णयाधिकार – गडकरी

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री आणि राज्याच्या अर्थमंत्र्यांनी तसेच वस्तू व सेवा कर परिषदेने संभाव्य वाहनांवरील जीएसटी दरात कपातीसंबंधी निर्णय घ्यायचा आहे, असा पुनरुच्चार भूपृष्ठ वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी केले. गेल्या आठवडय़ात वाहन निर्मात्यांची संघटना ‘सियाम’च्या वार्षिक संमेलनात बोलताना, वाहनांवरील जीएसटीचा दर २८ टक्क्य़ांवरून १८ टक्क्य़ांवर आणण्याची उद्योग क्षेत्राकडून होत असलेली मागणी रास्त असून आपला त्याला पाठिंबा असल्याचे गडकरी यांनी सांगितले. अर्थमंत्र्यांशी या मुद्दय़ावर चर्चा झाली असून, अंतिमत: निर्णय त्यांनीच घ्यावयाचा आहे, असे गडकरी यांनी सांगितले. जीएसटी परिषदेची बैठक २० सप्टेंबरला गोव्यामध्ये नियोजित आहे.