नवी दिल्ली : सलग चार महिन्यांत घसरण प्रवास नोंदविणाऱ्या देशातील प्रमुख उद्योग क्षेत्राने अखेर वाढ नोंदविली आहे. डिसेंबर २०१९ मध्ये हे क्षेत्र १.३ टक्क्यांनी विस्तारले आहे.

संसदेत मांडल्या जाणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पूर्वसंध्येला जाहीर झालेली ही सकारात्मक आकडेवारी सरकारसाठी एक मोठा दिलासा आणि महत्त्वाचे शुभसूचकच ठरले आहे.

वर्षभरापूर्वी, डिसेंबर २०१८ मध्ये प्रमुख आठ पायाभूत उद्योग क्षेत्रांची वाढ २.१ टक्के होती. मात्र डिसेंबरपूर्वीच्या सलग चारही महिन्यांत त्यात घसरण नोंदली गेली होती. ऑगस्ट २०१९ पासून क्षेत्र घसरण कायम होती.

कोळसा, खत तसेच तेल शुद्धीकरण उत्पादनांच्या निर्मितीतील वाढ प्रामुख्याने एकूण आठ क्षेत्राच्या पथ्यावर पडली आहे. तर स्टील, सिमेंट क्षेत्राची अनुक्रमे १.९ व ५.५ टक्के घसरणची नोंद आहे.

चालू वित्त वर्षांच्या एप्रिल ते डिसेंबर दरम्यान आठ क्षेत्रांची वाढ ०.२ टक्के राहिल आहे. वर्षभरापूर्वी, याच कालावधीत ती अधिक, ४.८ टक्के होती. एकूण औद्योगिक उत्पादन निर्देशांकात प्रमुख आठ क्षेत्रांचा हिस्सा ४०.२७ टक्के आहे.