करोना आजारसाथीचे संकट कोसळलेल्या एप्रिल ते जून २०२० या तिमाहीत भारताच्या अर्थव्यवस्थेचा अभूतपूर्व १६.५ टक्क्यांनी संकोच होऊ घातला आहे, असे भीतीदायी भाकीत स्टेट बँकेच्या ‘इकोरॅप’ या संशोधन अहवालाने व्यक्त केले आहे. मे महिन्यात बँकेच्या संशोधन अहवालाचे भाकीत अर्थव्यवस्था २० टक्क्यांनी खुंटण्याचे होते.

विशेषत: काही वित्तीय तसेच बिगरवित्तीय क्षेत्रातील कंपन्यांकडून जून तिमाहीअखेर कामगिरी जशी अपेक्षा केली गेली होती त्यापेक्षा सरस नोंदविली गेल्याचे दिसले आहे. त्यांच्या मिळकतीत जितकी घसरण अपेक्षिली जात होती त्यापेक्षा ती कमी राहिली असल्याचे आढळल्याने, त्याचा एकूण सकल राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी) मधील घसरणीला कमी करणारा परिणाम दिसेल, असे नमूद करीत अहवालाने अर्थसंकोचाचे प्रमाण २० टक्क्यांवरून १६.५ टक्क्यांवर आणले आहे.

एप्रिल ते जून तिमाहीसाठी आतापर्यंत भांडवली बाजारात सूचिबद्ध १,००० कंपन्यांनी त्यांचे वित्तीय निकाल घोषित केले आहेत. या निकालांवरून कंपन्यांच्या विक्री महसुलात २५ टक्क्य़ांची, तर नफा क्षमतेत सरासरी ५५ टक्क्य़ांची घसरण दिसून आली आहे. अहवालाचे मत असे की, करोनाकाळात खर्चावर आलेल्या मर्यादेच्या तुलनेत सूचिबद्ध कंपन्यांच्या तिमाहीत झालेली महसुलातील घसरण ही तितकी शोचनीय नाही आणि त्यामुळे तिने नफ्याच्या मार्जिनची मोठी हानी होण्याची शक्यताही कमी झाली आहे.