11 July 2020

News Flash

अर्थव्यवस्था वाढीचा दर ४.२ टक्क्य़ांवर

दुसऱ्या तिमाहीबाबत स्टेट बँकेच्या अहवालाचा अंदाज

(संग्रहित छायाचित्र)

 

पहिल्या तिमाहीत सहा वर्षांच्या तळात पोहोचलेल्या अर्थव्यवस्थेच्या वाढीच्या दराची दुसऱ्या तिमाहीच्या आकडेवारीची घटिका समीप असतानाच, हा वेग आणखी खालावण्याचा अंदाज आघाडीच्या बँकांनी व्यक्त केले आहे.

स्टेट बँकेचा संशोधनात्मक अहवाल तसेच सिंगापूरस्थित डीबीएस बँकेच्या मंगळवारच्या अभ्यास-अंदाज अहवालात भारताचा जुलै ते सप्टेंबर २०१९ दरम्यानचा विकास दर ५ टक्क्यांच्या खूप खाली असेल, असे नमूद करण्यात आले आहे.

दुसऱ्या तिमाहीत ४.२ टक्के तर संपूर्ण विद्यमान वित्त वर्षांत विकास दर ५ टक्के असेल, असे स्टेट बँकेने म्हटले आहे. वाहन विक्रीतील घसरण, विमानातून प्रवासी वाहतुकीतील घसरण तसेच बांधकाम व पायाभूत क्षेत्रातील गुंतवणूक घसरण याचा विपरित परिणाम देशाच्या विकास दरावर होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीत, एप्रिल ते जूनदरम्यान भारताने ५ टक्के असा गेल्या सहा वर्षांतील तळ दाखविणारा विकास दर नोंदविला होता. तर दुसऱ्या तिमाहीतील स्थिती येत्या २९ नोव्हेंबर रोजी स्पष्ट होणार आहे. सप्टेंबरमधील सात महिन्यांच्या तळातील औद्योगिक उत्पादन दर सोमवारीच स्पष्ट पुढे आला आहे.

विद्यमान २०१९-२० या संपूर्ण आर्थिक वर्षांत  ५ टक्के विकास दरानंतर पुढील वित्त वर्षांत देशाच्या अर्थप्रगतीचा दर ६.२ टक्के असेल, असा विश्वास स्टेट बँकेने तिच्या अहवालातून व्यक्त केला गेला आहे. परिणामी, डिसेंबरमधील पतधोरणात रिझव्‍‌र्ह बँक अधिक प्रमाणात व्याजदर कपात करेल, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे.

भारतीय अर्थव्यवस्थेच्या भविष्याच्या अंदाजाबाबत मूडीजने व्यक्त केलेल्या पतदर्जाचा मोठा परिणाम जाणवणार नाही, असा दिलासाही स्टेट बँकेने दिला आहे. देशाच्या वित्तीय तुटीबाबतही चिंता करण्यासारखी स्थिती नाही, असेही अहवालात नमूद करण्यात आली आहे.

विकासदर ५ टक्क्य़ांखाली घसरणार : डीबीएस

जूनअखेरच्या पहिल्या तिमाहीतील ५ टक्के अशा सहा वर्षांच्या तळातील विकास दराचा उल्लेख करतानाच सप्टेंबरमधील घसरत्या औद्योगिक उत्पादन दराची आठवण करून देताना डीबीएस बँकेने सप्टेंबरअखेरच्या दुसऱ्या तिमाहीतील विकास दर ५ टक्क्यांपेक्षाही कमी असेल, असे नमूद केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 13, 2019 12:39 am

Web Title: economy growth rate at 4 2 percent abn 97
Next Stories
1 फंड निवडीसाठी परतावा पाहणे पुरेसे?
2 वाहन विक्री अखेर घसरणीतून बाहेर
3 म्युच्युअल फंड गंगाजळी २६.३३ लाख कोटींवर;ऑक्टोबरमध्ये ‘इक्विटी’ फंडातील गुंतवणुकीत मात्र घट
Just Now!
X