21 March 2019

News Flash

भारताने ७.३ टक्के विकासदर गाठणे शक्य!

आशियातील सर्वात वेगवान अर्थव्यवस्था म्हणून स्थान अबाधित

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

आशियातील सर्वात वेगवान अर्थव्यवस्था म्हणून स्थान अबाधित

भारताच्या अर्थव्यवस्थेचा वाढीचा दर चालू आर्थिक वर्षांत ७.३ टक्क्यांपेक्षा अधिक राहील तर त्यानंतरच्या वर्षांत तो ७.६ टक्क्यांवर जाईल, असा आशावाद आशियाई विकास बँक अर्थात एडीबीने वर्तविला आहे. वस्तू आणि सेवा कराची अंमलबजावणी आणि बँकिंग सुधारणांचे हे फलित असेल आणि भारताला आशिया खंडातील सर्वात वेगवान अर्थव्यवस्था म्हणून लौकिक कायम राखता येईल, असा या वित्तसंस्थेचा कयास आहे.

एडीबीने आपल्या आशियाई विकासावर दृष्टिक्षेप असे शीर्षक असलेल्या अहवालात, भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत आशादायी संकेत दिले असले तरी, अन्य आशियाई देशांसाठी व्यापारातील जोखीम उच्च राहील आणि त्याच्या मुकाबल्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजनांतून आर्थिक विकासदराला हानी पोहचेल, असे भाकीत केले आहे.

भारतीय अर्थव्यवस्था ही निश्चलनीकरणाने साधलेले विपरीत परिणाम आणि वस्तू-सेवा कराच्या अंमलबजावणीने व्यापार-उदीमाची घडी विस्कटली असतानाही ६.६ टक्के दराने विकास साधला. तर २०१६-१७ मध्ये देशाच्या अर्थव्यवस्थेने ७.१ टक्के विकासदर नोंदविला होता.

अल्पावधीत काहीशी किंमत मोजावी लागली असली तरी वस्तू आणि सेवा कराची अंमलबजावणी ही नजीकच्या भविष्यात भारताच्या अर्थवृद्धीला चालना देणारी मोठी शक्ती ठरेल, असे एडीबीचे मुख्य अर्थतज्ज्ञ यासूयुकी सावाडा यांनी मत व्यक्त केले आहे. व्यापारानुकूल वातावरणासाठी सरकारचे प्रयत्न आणि उदारीकरणाचे धोरण यामुळे थेट विदेशी गुंतवणुकीचा दमदार ओघ हा अर्थव्यवस्थेला आणखी बळ देईल, असा सावाडा यांचा कयास आहे.

अमेरिकेने अनुसरलेल्या बचावात्मक व्यापार धोरणाचे परिणाम अद्याप पुरते स्पष्ट झाले नसून, आशियाई देशांच्या आयात-निर्यात व्यापाराच्या दृष्टीने त्याच्या परिणतीची अहवालात दखल घेतली गेली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

First Published on April 12, 2018 1:54 am

Web Title: economy of india