मागील तीन तिमाहींच्या तुलनेत निराशाजनक राहिलेल्या भारताच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीच्या दराने शेजारच्या चीनला मात्र  याबाबत मात दिली आहे. त्याचप्रमाणे  जागतिक तुलनेतही भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा वेग सर्वाधिक नोंदला गेला आहे.

जुलै ते सप्टेंबर या २०१८-१९ मधील दुसऱ्या तिमाहीतील अर्थप्रगतीचे चित्र शुक्रवारी स्पष्ट झाले. केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या आकडेवारीनुसार, या तिमाहीत आर्थिक विकास दर ७.१ टक्के नोंदला गेला आहे. तो आधीच्या तिमाहीतील ८.२ टक्क्यांच्या तुलनेत लक्षणीय घसरला असला तरी वार्षिक तुलनेत ६.३ टक्क्यांच्या दरापेक्षा तो अधिक आहे.

रकमेमध्ये भारताचे सकल राष्ट्रीय उत्पादन यंदाच्या तिमाहीत ३३.९८ लाख कोटी रुपये राहिले आहे. गेल्या वर्षी जुलै ते सप्टेंबर २०१७ मध्ये ते ३१.७२ लाख कोटी रुपये होते. गेल्या वित्त वर्षांतील शेवटच्या दोन तिमाहींमध्ये विकास दर ७ ते ७.७ टक्क्यांदरम्यान नोंदला गेला आहे. चीनचा जुलै ते सप्टेंबरमधील ६.५ टक्के विकास दर नुकताच जाहीर झाला. गेल्या काही वर्षांतील तो किमान नोंदला गेला आहे. भारतात यंदाच्या तिमाहीत निर्मिती क्षेत्राची वाढ ७.४ टक्के तर कृषी क्षेत्राची वृद्धी ३.८ टक्के झाली आहे.

केंद्रीय अर्थव्यवहार सचिव सुभाषचंद्र गर्ग भारताचा विकास दर एप्रिल ते सप्टेंबर या चालू आर्थिक वर्षांतील पहिल्या सहामाहीत उत्साहवर्धक राहिल्याचे नमूद केले आहे. चीनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकणारा हा दर जगातील अर्थव्यवस्थेतही सर्वोत्तम असल्याचे ते म्हणाले.

एकूणच कर रचनेला तंत्रज्ञानाची जोड देऊन प्रक्रियेत सुलभता, अनुपालन तसेच करविषयक नियम शिथिल करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू आहेत. गेल्या चार वर्षांत कर-राष्ट्रीय सकल उत्पादन गुणोत्तर १० वरून ११.५ टक्क्यांपर्यंत सुधारले आहे. घसरते वस्तू व सेवा करसंकल चिंताजनक जरूर आहे, परंतु त्याबाबतही उपाययोजना सुरू आहेत.   – अजय भूषण पांडे, नवनियुक्त केंद्रीय महसूल सचिव